केज : मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याचा मोबाईल प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर संघटित गुन्हेगारीतील अनेक बड्या हस्तींचा समावेश उघड होणार आहे. त्यामुळे चाटेच्या मोबाईलचा शोध घ्यावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच चाटेच्या मोबाइलवरून अनेक बड्या हस्तींना या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी फोन केल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५९ दिवस उलटले आहेत. यात आठ आरोपी अटक असून नववा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही मोकाटच आहे. अशातच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेच्या मोबाईलबाबत खळबळजनक दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पुराव्यांच्या जपणुकीसाठी मुख्यमंत्र्यांशी संपर्कविष्णू चाटेचा मोबाईल मिळालाच पाहिजे. त्यात अनेक व्हिडीओ आहेत. केलेल्या व्हिडीओ कॉलची नोंद आहे, मोबाईलवर त्याने कोणाकोणाशी संपर्क साधला, या सर्व नोंदी आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासकामी हा मोबाइल खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर केवळ पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करून काहीच होणार नाही. तर त्याचा मोबाईल पोलिसांनी मिळविलाच पाहिजे. याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असून, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी यासाठी सोमवारीच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती, धनंजय देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नारायण गडाच्या महंतांनी घेतली भेटश्री संत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री सानप यांची धनंजय देशमुख यांनी भेट घेऊन सर्व गुन्हेगारांची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी नारायण गडाचे महंत हभप शिवाजी महाराज व हभप मेंगडे महाराज यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.