माजलगावात घरफोडी; चाकूच्या धाकावर ७ लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 17:39 IST2020-07-14T17:36:54+5:302020-07-14T17:39:46+5:30
शहरातील नवीन भाटवडगाव वसाहतीतील घटना

माजलगावात घरफोडी; चाकूच्या धाकावर ७ लाखाचा ऐवज लंपास
माजलगाव : शहरातील नवीन भाटवडगाव वसाहतीत मंगळवारी पहाटे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. तीन चोरट्यांनी ग्रामसेवक व शिक्षक अशा नोकरदार दाम्पत्याचे घर फोडून चाकूच्या धाकावर रोख ५ लाख रुपयांसह दागिने असा तब्बल ६ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
शहरात नवीन भाटवडगाव वसाहतीत सावरगाव येथील ग्रामसेवक नवनाथ हेमा पवार यांचे घर आहे त्यांच्या पत्नी शीतल पवार या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. मंगळवारी पहाटे ३.३० वाजेच्यादरम्यान तीन चोरट्यांनी प्रथम पवार यांच्या भाडेकरूच्या घराचे बाहेरून कडी लावली. त्यानंतर चॅनेल गेट व दरवाजाचे कडीकोंडे तोडून घरात प्रवेश केला. पवार व त्यांच्या पत्नीस चाकूचा धाक दाखवत रोख ५ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने असा ६ लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केला.
या चोरीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत व पोलीस कर्मचारी यांनी तपास सुरू केला. अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. तर दरोडा प्रतिबंधक पथकाने आपला तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बहिणीला देण्यासाठी काढले होते पैसे
ग्रामसेवक पवार यांच्या बहिणीस प्लॉट घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच पैशांची जुळवाजुळव करून पैसे बँकेच्या खात्यातून घरी आणून ठेवले होते. पाळत ठेवून मोठ्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.