परळीत जीपची काच फोडून साडेतीन लाखांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:22 IST2018-11-04T00:21:48+5:302018-11-04T00:22:41+5:30
शहरातील अंबाजोगाई रोडवरील असलेल्या एका एजन्सीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या धारुर तालुक्यातील फकीर जवळा येथील एका व्यक्तीचे ३ लाख ६० हजार रुपये जीपच्या काचा फोडून चोरल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली.

परळीत जीपची काच फोडून साडेतीन लाखांची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहरातील अंबाजोगाई रोडवरील असलेल्या एका एजन्सीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या धारुर तालुक्यातील फकीर जवळा येथील एका व्यक्तीचे ३ लाख ६० हजार रुपये जीपच्या काचा फोडून चोरल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली.
फकीर जवळा येथील पंडित जगन्नाथराव राठोड (३६) हे ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. दिवाळी निमित्त ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पंडीत राठोड हे परळीत शनिवारी आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील अंबाजोगाई रोडवरील ट्रॅक्टरच्या एजन्सी कार्यालयासमोर जीप उभी करुन लॉक केली व एजन्सीत गेले. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने काचा फोडून जीपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जीपमधील ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. एजन्सीमधून बाहेर आल्यानंतर जीपच्या काचा फुटलेल्या व त्यातील रक्कम लंपास झाल्याचे राठोड यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार परळी शहर ठाण्याला कळविला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.
राठोड यांच्या सोबत घरातील इतर तिघे जण होते. राठोड यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या अंबाजोगाई येथील बँकेच्या खात्यातून धनादेशाद्वारे ३ लाख ६० हजार रु पये काढले होते. ते पैसे परळीत आणले होते. फकीर जवळा येथील मित्राची जीप भाड्याने घेऊने ते परळीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आले होते. ५० हजार रु पयांचे सात बंडल ३ लाख रुपये व १०० रु पयाचे दहा हजाराचे एक बंडल असे एकूण ३ लाख ६० हजार रु पये वाहनामध्ये ठेवले होते. ते अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे राठोड यांनी सांगितले. सीसीटीव्ही मध्ये दोघांचे चेहरे दिसत असल्याचे सांगण्यात आले. भर दुपारी घडलल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.