प्रियकराने विधवा महिलेचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:19 IST2019-02-18T14:17:50+5:302019-02-18T14:19:26+5:30
मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे.

प्रियकराने विधवा महिलेचा खून करून रचला आत्महत्येचा बनाव
बीड/गेवराई : उमापूर येथील अनिता विष्णु तुजारे (२५ रा. वरूळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर ह.मु.उमापूर ता.गेवराई) या विधवा महिलेचा शनिवारी गळा आवळून खून करण्यात आल्यानंतर मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला, मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे सांगण्यात येत असून, मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे.
पाच वर्षांपूर्वी अनिताचा विवाह झाला होता. आजाराने तिच्या पतीचे निधन झाले. तिला पतीपासून दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. पतीचे निधन झाल्यापासून अनिता ही उमापूर येथे माहेरीच राहत होती. माहेरी आल्यावर गल्लीतील दत्ता किशन खरात याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दत्ता विवाहित असून, तो पाच मुलींचा बाप आहे. कालांतराने त्यांच्यातही वाद निर्माण झाले. या वादातच अनिताचा बळी गेला. तिचा मृतदेह आत्महत्या वाटावी अशा पद्धतीने लटकवून ठेवला होता. खुनाचा प्रकार समोर आल्यानंतर दत्ताला अटक करण्यात आली आहे.