The body of the missing tractor driver was found in the lake for 3 days | ४ दिवसांपासून गायब ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह आढळला तलावात
४ दिवसांपासून गायब ट्रॅक्टरचालकाचा मृतदेह आढळला तलावात

बीड : तालुक्यातील घोडका राजूरी येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह येथील तलावातील सांडव्याच्या भिंतीजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच पिंपळनेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज राम सकाडे (३५, रा.घोडका राजुरी,ता.बीड) असे मयताचे नाव आहे. तो गावात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. चार दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो परतलाच नाही. मनोज यांचा शोध नातेवाईक घेत होते. दरम्यान शनिवारी सकाळी मनोजचा मृतदेह घोडका राजुरी येथील तलावाच्या सांडव्याजवळ आढळून आला. ही माहिती मिळताच पिंपळनेर ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मृतदेह पाण्यावर तरंगत होता, पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. सुरुवातीला मयताची ओळख पटली नव्हती. त्यानंतर गावातील नागरिकांना हा मृतदेह मनोज सकाडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवला. याप्रकरणी मृताचे भाऊ शहादेव राम सकाडे यांच्या खबरेवरुन पिंपळनेर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
तोंडावरील मारामुळे संशय, पोलिसांचा तपास सुरु
मयत मनोज यांना पोहता येत असल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली. तसेच मृतदेह बाहेर काढला, त्यावेळी तोंडावर मार लागल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा अपघात आहे का घातपात; याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: The body of the missing tractor driver was found in the lake for 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.