'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 19:46 IST2022-01-22T19:46:08+5:302022-01-22T19:46:32+5:30
ही घटना अंबाजोगाईत घडली असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी
अंबाजोगाई : येथील भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना जिवे मारण्याची धमकी देत शिपायाला चाकूे लावून लुटले. २१ जानेवारी रोेजी रसवंतीवर उसाचा रस पिण्यासाठी गेल्यावर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
मुराजी प्रकाश साखरे असे आ. मुंदडा यांच्या शिपायाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आ. नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा हे रस पिण्यासाठी बीड रोडवरील एका रसवंतीमध्ये गेले. मुराजी रस पिऊन रसवंतीच्या बाहेर आला असता त्याचवेळी शेजारच्या हॉटेलमधून लखन भाकरे (रा. अंबाजोगाई) हा अन्य पाच जणांसोबत तिथे आला. त्याने मुराजीच्या गळ्याला चाकू लावून दीड तोळ्याचे सोन्याचे लॉकेट आणि खिशातील ६ हजार ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
मुराजीचा आरडाओरडा ऐकून अक्षय मुंदडा आणि अन्य काही जण धावत आले आणि त्यांनी लखन भाकरे याला पकडले, तर त्याचे साथीदार शेजारच्या शेतात पळून गेले. मला सोड, नाही तर तुला खल्लास करून टाकीन, अख्ख्या अंबाजोगाईत माझी दहशत आहे, अशी धमकी यावेळी लखनने अक्षय मुंदडा यांना दिली. त्यानंतर अक्षय मुंदडा यांनी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले आणि लखनला त्यांच्या हवाली केले. लखन भाकरे आणि अन्य पाच जणांवर कलम ३९५, ३९७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. बाळासाहेब पवार करीत आहेत.