बिरदेव यात्रेला निघाले, नियतीने घात केला! केजच्या भाविकाचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:57 IST2025-10-13T15:57:17+5:302025-10-13T15:57:31+5:30
सोबती होते, पण वाचवू शकले नाहीत! डोळ्यांदेखत घडलेल्या दुर्घटनेने सहकाऱ्यांना जबर धक्का

बिरदेव यात्रेला निघाले, नियतीने घात केला! केजच्या भाविकाचा कृष्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
बीड : केज येथून कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकडोली येथील बिरदेव यात्रेला गेलेल्या केज येथील एका भाविकाचा नरसिंहवाडी येथील कृष्णा नदीच्या घाटावर पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. अशोक रामकिसन सौदागर (वय ३८, रा. अहिल्यानगर, उमरी रोड, केज) असे मयत भाविकाचे नाव आहे.
अशोक सौदागर हे त्यांच्या पाच सहकाऱ्यांसोबत शनिवारी रात्री नऊ वाजता एका खासगी वाहनाने पट्टणकडोली येथील यात्रेसाठी रवाना झाले होते. रविवारी पहाटे ते सर्वजण नरसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर देवस्थान परिसरालगत वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या घाटावर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळ करताना घाटाच्या पायरीवरून अशोक यांचा पाय घसरला आणि ते नदीच्या पाण्यात पडले. ही बाब सहकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ त्यांना पाण्याबाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेतील अशोक यांना तातडीने नरसिंहवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केले. घटनेची नोंद शिरोळ ठाण्यात करण्यात आली. दुपारी १२ वाजता पार्थिव नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. केज येथे गॅस एजन्सीचे सिलिंडर घरोघरी पोहोचवण्याचे काम करत असल्याने अशोक सर्वपरिचित होता. त्याच्या पार्थिवावर सोमवारी क्रांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.