मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ८० दिवसांत दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 04:49 IST2025-02-28T04:48:53+5:302025-02-28T04:49:12+5:30

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. या गुन्ह्याच्या काही दिवस अगोदर ॲट्रॉसिटी, मारहाण आणि खंडणीचे गुन्हे घडले होते.

Big update in Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; Chargesheet filed in 80 days | मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ८० दिवसांत दोषारोपपत्र दाखल

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ८० दिवसांत दोषारोपपत्र दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर दोन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र ‘सीआयडी’कडून बीडच्या मकोका न्यायालयात गुरुवारी दाखल केले. हे दोषाराेपपत्र एक हजार पानांचे आहे, तर दुसऱ्या बाजूला कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे. दरम्यान, मकोकाच्या गुन्ह्यात १८० दिवसांचा कालावधी असतानाही केवळ ८० दिवसांत दोषाराेपपत्र दाखल केल्याने खा. बजरंग साेनवणे यांनी आक्षेप नोंदविला आहे.

संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाली होती. या गुन्ह्याच्या काही दिवस अगोदर ॲट्रॉसिटी, मारहाण आणि खंडणीचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यासह नऊजणांचा समावेश आहे. यातील आठ आरोपी अटक असून, कृष्णा आंधळे हा फरारच आहे. 

हे आहेत आरोपी...
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे व कृष्णा आंधळे अशी या तिन्ही गुन्ह्यांतील आरोपींची नावे आहेत. यातील कृष्णा वगळता सर्वच आरोपी अटक आहेत. बीड पोलिसांच्या चार पथकांसह सीआयडीचे पथकही कृष्णा आंधळेच्या  मागावर 
आहे.  

मकोकामध्ये १८० दिवसांची मुभा असताना ८० दिवसांतच दोषारोपपत्र दाखल केले, जर शिक्षा देण्यासाठी केले असेल तर कौतुकच आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे. आता हे दोषाराेपपत्र वाचल्यानंतर समजेल की, आरोपीला सोडायला दाखल केले, की शिक्षा द्यायला. 
- बजरंग सोनवणे, खासदार

दोषारोपपत्र दाखल झाल्याचे समजले. यातील सर्व आरोपींना शिक्षा होईल, असा विश्वास आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांच्याशी आणखी बोलणे झाले नाही. परंतु, आदेश मिळाल्यावर आम्ही त्यांची भेट घेणार आहोत.  
- धनंजय देशमुख, मस्साजोग

Web Title: Big update in Massajog Sarpanch Santosh Deshmukh murder case; Chargesheet filed in 80 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.