मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळा; अध्यक्ष चंदूलाल बियाणी न्यायालयासमोर हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 15:39 IST2024-12-02T15:37:16+5:302024-12-02T15:39:09+5:30
अध्यक्ष चंदूलाल बियाणीने अंबाजोगाई न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

मोठी बातमी! राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळा; अध्यक्ष चंदूलाल बियाणी न्यायालयासमोर हजर
बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवून घेतल्या. नंतर त्या परत केल्या जात नसल्याने ठेवीदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याप्रमाणे अध्यक्ष चंदुलाल बियाणीसह संचालकांवर गुन्हे दाखल झाले होते. यात आतापर्यंत फरार असलेले बियाणी सोमवारी अंबाजोगाईत न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना अंबाजोगाई पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले.
परळी येथे चंदुलाल बियाणी यांनी राजस्थानी मल्टीस्टेट उघडली. यात लोकांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी घेतल्या. परंतु, नंतर त्या परत करण्यास हे अपयशी ठरले. त्यामुळे कारवाईसाठी परळी तहसीलसमोर आगोदर सात दिवस साखळी उपोषण केले. परळी शहर ठाण्यासमोरही सात दिवस उपोषण केले. बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर २४ मे रोजी परळी शहर पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर लातूर, परळी, अंबाजोगाई, नांदेड, उदगीर, घाटनादूर, संभाजीनगर, नाशिक, बीड शहर अशा विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. आजही हे सत्र सुरूच आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत चंदुलाल बियाणी यांचा मुलगा अभिषेक बियाणी याला अटक करण्यात आलेली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू होता. सोमवारी अध्यक्ष चंदुलाल बियाणी स्वत:हून अंबाजोगाई न्यायालयासमोर हजर झाले. त्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले. आता त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी मागितली जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवी जमा केल्या मात्र, त्यानंतर बीड जिल्हयातील परळी येथील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करत बियाणी यांनी पोबारा केला. कष्टाचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यानं ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह सर्व संचालक मंडळावर ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी रुपये बुडवल्या प्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.