मोठी बातमी! बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका; घरात घुसून केला होता गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:17 IST2025-01-28T19:16:59+5:302025-01-28T19:17:15+5:30
आठवले टोळीतील चार आरोपी अटकेत असून दोघे अजूनही फरार आहेत.

मोठी बातमी! बीडमध्ये आणखी एका गँगवर मकोका; घरात घुसून केला होता गोळीबार
बीड : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून गोळीबार केला. यात एक जण जखमी झाले होते. याच प्रकरणातील आरोपी आठवले गँगवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील कलमांचा अंतर्भाव करून मकोका लावण्यात आला आहे. टोळीतील चार आरोपी अटकेत असून दोघे अजूनही फरार आहेत. सोमवारी बीड पोलिसांच्या वतीने ही माहिती देण्यात आली. या अगोदर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, वाल्मीक कराडसह नऊ जणांवर मकोका लावल्याची कारवाई ताजी असतानाच हा दुसरा दणका बीड पोलिसांनी दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बीड शहरातील बार्शी नाका भागात अक्षय शाम आठवलेसह त्याच्या गँगने विश्वास डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. यात ते जखमी झाले होते. तसेच महिलेलादेखील पिस्तूलचा धाक दाखविला होता. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात १३ डिसेंबर २०२४ रोजी अभिषेक विश्वास डोंगरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. अगोदर याचा तपास पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी केला. परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नंतर तो स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्याकडे देण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चार आरोपी अटकही केले होते. इतर दोघांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी विश्वंभर गोल्डे, पोलिस निरीक्षक उस्मान शेख, अशोक मुदीराज, पोउपनि. सिद्धेश्वर मुरकुटे, महेश विघ्ने, अभिमन्यू औताडे, पी. टी. चव्हाण, हवालदार मनोज वाघ, विकास वाघमारे, राहुल शिंदे, नीलेश ठाकूर, बिभीषण चव्हाण, सुभाष मोठे आदींनी केली.
प्रस्ताव अन् नऊ दिवसांत कारवाई
पोलिस निरीक्षक शेख यांनी १८ जानेवारी रोजी प्रस्ताव पोलिस अधीक्षकांना दिला. २३ जानेवारीला अधीक्षकांनी शिफारशीसह तो छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांना पाठवला. २७ जानेवारी रोजी मिश्रा यांनी त्याला मंजुरी दिली. अवघ्या नऊ दिवसांत मकोकाच्या प्रस्तावावर कारवाई झाली. आता याचा तपास बीडच्या डीवायएसपींकडे देण्यात आला आहे.
गँगमध्ये कोण सदस्य?
आठवले गँगचा प्रमुख हा अक्षय श्याम आठवले (वय २८) हा आहे. त्यात मनीष ऊर्फ प्रतीक प्रकाश क्षीरसागर (वय २५), ओंकार सिद्धार्थ सवई (वय २५), प्रसाद मोतीराम धिवार, सनी श्याम आठवले आणि आशिष श्याम आठवले यांचा समावेश आहे. यात सनी आणि आशिष हे दोघे अजूनही फरार आहेत. यातील फरार सनी आठवले याने पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आणि वाल्मीक कराड याची कथित कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल केली होती.
बनावट नोटांसह १९ गंभीर गुन्हे
या आठवले गँगवर बनावट नोटांसह १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी करणे, अवैध शस्त्र (गावठी कट्टा) बाळगणे, अवैधरीत्या अग्निशस्त्रांची विक्री करणे, गर्दी, मारामारी करणे, अग्नीशस्त्रे चालविणे, पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून जीवघेणा हल्ला करून पळून जाणे, सरकारी कामात अडथळा आणणे, खंडणी मागणे आदींचा समावेश आहे.
---