महादेव मुंडे प्रकरणात मोठी घडामोड, ज्ञानेश्वरी मुंडेंसह पूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:14 IST2025-07-30T16:14:27+5:302025-07-30T16:14:27+5:30
आरोपींना अटक करण्याची मागणी होणार; सदर प्रकरण ऑक्टोबर २०२३ मध्ये घडले असून, अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही.

महादेव मुंडे प्रकरणात मोठी घडामोड, ज्ञानेश्वरी मुंडेंसह पूर्ण कुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीस मुंबईकडे
परळी : येथील महादेव दत्तात्रय मुंडे खून प्रकरणातील आरोपी २१ महिने झाले तरी अद्यापही मोकाट आहेत. या पार्श्वभूमीवर मुंडे कुटुंबाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी (३० जुलै) दुपारी एक वाजता मुंडे कुटुंब मुंबईकडे रवाना झाले.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे, त्यांची तीन मुले,वडील दत्तात्रय मुंडे आई चंद्रकला मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड असे कुटुंबीय गुरुवारी (३१ जुलै) सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी यांनी बुधवार रात्री सतीश फड यांना फोन करून भेटीची वेळ दिल्याची माहिती मिळाली आहे.
या भेटीत महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकामध्ये पोलिस अधिकारी पंकज कुमावत व पोलीस निरीक्षक साबळे यांचा समावेश करावा, अशीही विनंती करण्यात येईल, असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.
सदर प्रकरण ऑक्टोबर २०२३ मध्ये घडले असून, अद्यापही एकाही आरोपीला अटक झालेली नाही. तपास पथकात अधिकाऱ्यांची अदलाबदल झाली असली तरीही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आरोपींना तात्काळ अटक करून न्याय मिळावा, ही मागणी मुंडे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी परळीत येऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली होती. दरम्यान मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात फोन करून ज्ञानेश्वरी मुंडे यांना वेळ द्यावा असे मनोज जरांगे यांनी सांगितले होते. तसेच मंगळवारी आमदार रोहित पवार यांनी परळी येथे येऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांची व त्यांच्या मुलांची भेट घेतली आहे