मोठी कारवाई ! विशेष पथकाच्या छाप्यात ६० लाखांचा गुटखा जप्त; दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 10:25 IST2021-09-15T10:23:49+5:302021-09-15T10:25:34+5:30
Crime News in Beed : बीड- परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती.

मोठी कारवाई ! विशेष पथकाच्या छाप्यात ६० लाखांचा गुटखा जप्त; दोघे ताब्यात
बीड: तालुक्यातील घोडका राजुरी येथे एका गोदामावर छापा टाकून पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या विशेष पथकाने सुमारे ६० लाखांचा गुटखा जप्त केला. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता ही कारवाई करण्यात आली.
बीड- परळी मार्गावरील घोडका राजुरी फाट्यावर एका गोदामात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून १५ सप्टेंबर रोजी सकाळी पथकप्रमुख सहायक निरीक्षक विलास हजारे व सहकाऱ्यांनी तेथे छापा टाकला. एका ट्रक व एका टेम्पोतून गुटखा भरून नेत असतानाच पथक तेथे धडकले. यावेळी दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेण्यात आले. गुटख्याचा अंदाजे ६० लाख रुपयांचा साठा हस्तगत करण्यात आला. गुटखा, दोन वाहने, दोन आरोपी असा सारा लवाजमा घेऊन पथक पिंपळनेर ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी दिली.
पोलिसांच्या आशीर्वादा'मुळे' माफियागिरी
दरम्यान, घोडका राजुरी येथे राजरोस सुरू असलेल्या गुटख्याच्या गोरखधंद्यात मुळे नावाचा माफिया असून पोलीस आणि स्थानिक नेत्यांकडे त्याची उठबस असते. त्यामुळे पिंपळनेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्याने गुटख्याचे गोदाम थाटले होते. यापूर्वी पेठ बीड पोलिसांच्या ताब्यातून गुटख्याचा टेम्पो पळविल्याच्या प्रकरणात त्याचा सहभाग आढळला होता, पण पेठ बीड पोलिसांनी खोलवर तपास न केल्याने तो सहीसलामत सुटला. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादा'मुळे' फोफावलेल्या माफियागिरीला या कारवाईने दणका बसला आहे.