The BEO will conduct an inspection of RTE accredited schools | बीईओ करणार आरटीई प्रवेशपात्र शाळांची तपासणी

बीईओ करणार आरटीई प्रवेशपात्र शाळांची तपासणी

ठळक मुद्देनोंदणी झालेल्या पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन गटशिक्षणाधिकारी पातळीवर होणार

- अनिल भंडारी  

बीड :  आरटीई प्रवेशपात्र सन २०१९-२० च्या अ‍ॅटोफॉरवर्ड केलेल्या शाळेची व नवीन शाळांची नोंदणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे निकषपात्र शाळाच आता आॅनलाईन पोर्टलवर दिसणार आहेत. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयंअर्थ सहाय्यित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५  टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलां-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यासाठी तीनऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. २०२०-२१ वर्षासाठी आॅनलाईन प्रवेश  प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. शाळांमधील रिक्त पदांची व नियम अनुपालनाची पडताळणी आता गटशिक्षणाधिकारी पातळीवरील समिती करणार आहे. संबंधित शाळांची पटसंख्या आॅनलाईन सरल पोर्टलवर दिसणार आहे. मागील ३ वर्षांची प्रवेश वर्गाची पटसंख्या लक्षात घेऊन आरटीईची रिक्त पदे ही समिती निश्चित करणार आहे. बीईओंकडून पडताळणी झाल्यानंतर पात्र शाळांना त्यांच्या लॉगिनवर रिक्त जागा कळणार आहेत. 

शाळांचे बिंग फुटणार
तालुक्यातील एखादी शाळा बंद असेल किंवा एखाद्या शाळेला मागील तीन वर्षांपासून विद्यार्थी संख्या नियमाप्रमाणे प्राप्त नसेल अशा शाळा आरटीई प्रवेशासाठी बंद करण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. प्रवेशपात्र इंग्रजी शाळांची पडताळणी बीईओ स्तरावरच होणार  आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या  निर्देशानुसार नोंदणी झालेल्या पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन गटशिक्षणाधिकारी पातळीवर होणार आहे. यासाठी २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी असा कालावधी आहे.
 - गौतम चोपडे,   समन्वयक आरटीई तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी, बीड

Web Title: The BEO will conduct an inspection of RTE accredited schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.