Beed Crime Latest News: मस्साजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीडमधील गुन्हेगारीचा क्रूर चेहरा समोर आला. तेव्हापासून बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाचा तसाच एक प्रकार समोर आला आहे. माजलगाव तालुक्यामध्ये एका उपसरपंचाला रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यात आली. काही आरोपी व्हिडीओ शूट करत असून, डोक्यात मार, पायावर मार असे म्हणताना दिसत आहे. एका आरोपीने उपसरपंचाच्या डोक्यात दगड घालण्याचाही प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली आहे. निपाणी टाकळी नावाचे गाव आहे, तिथे हा सगळा प्रकार घडला. व्हिडीओमध्ये ज्यांना आरोपी मारत आहेत, ते उपसरपंच लक्ष्मण चव्हाण आहेत.
उपसरपंचावर प्राणघातक हल्ला का केला?
ही घटना शुक्रवारी (११ जुलै) संध्याकाळी निपाणी टाकळीतीलच रस्त्यावर घडली. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीकडून झालेल्या चुकीच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.
याचा सरपंचाच्या पतीला राग आला. ग्रामसभेत चुकीच्या कामाला विरोध केला म्हणून सरपंच महिलेच्या पतीला राग आला. त्याने तीन-चार जणांच्या टोळक्याला सोबत घेतले आणि उपसरपंचाला रस्त्यात अडवले.
दांडक्यांनी मारहाण, डोक्यात दगड टाकला, पण...
लक्ष्मण चव्हाण आणि त्यांचे सोबती हे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून पाच वाजेच्या दरम्यान गावाकडे निघाले होते. त्याचवेळी काही गावगुंडांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. रस्त्यातच त्यांची गाडी अडवली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
चव्हाण यांना आधी लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. एका आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारला, पण तो त्यांनी चुकवला. आरोपी त्यांना बेदमपणे मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काही जण जोरजोरात ओरडत आहेत. त्याच्या डोक्यात मार, पायावर मार, डोक्यात दगड घाल, असे म्हणताना दिसत आहेत. संतोष देशमुख यांचे आरोपींनी कपडे काढले होते. तसाच प्रकार इथेही घडताना दिसला. आरोपी लक्ष्मण चव्हाण यांना कपडे काढायला सांगताना दिसत आहे. तो त्यांचे शर्टाचे बटण काढतानाही दिसत आहे.
वाचा >>पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
दरम्यान, मारहाण पाहून काही लोक जमा झाले. त्यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. डोक्यात मारू नका. काही वाईट घडेल असेही काही जण म्हणत आहेत. त्यानंतर आरोपींनी चव्हाण यांना सोडले. या मारहाणीत चव्हाण यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. हात आणि पाय फ्रॅक्चर झाल आहे. त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माजलगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.