चिमुकलीने धाडसाने उधळून लावला अपहरणाचा डाव; हाताला चावा घेऊन करून घेतली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 19:30 IST2025-04-10T19:16:56+5:302025-04-10T19:30:58+5:30

ग्रामस्थ आणि पोलिसांनी घाबरून न जाता चिमुकलीने मोठ्या धाडसाने स्वतःची सुटका करून घेतल्याने तिचे कौतुक केले आहे.

Beed: Toddler bravely foils kidnapping plot; escapes by biting hand | चिमुकलीने धाडसाने उधळून लावला अपहरणाचा डाव; हाताला चावा घेऊन करून घेतली सुटका

चिमुकलीने धाडसाने उधळून लावला अपहरणाचा डाव; हाताला चावा घेऊन करून घेतली सुटका

- नितीन कांबळे
कडा ( बीड) :
आई वडील बाहेर गावी गेल्याने घरच्या अंगणात एकटीच खेळत असलेल्या चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न आज सकाळी अकरा वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या चिमुकलीने धाडसाने अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन स्वतःची सुटका करून घेतली. ही धक्कादायक घटना अंभोरा येथील 'वडाचे मळा' शेत वस्तीवर घडली.

आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील वडाचे मळा येथील शेत वस्तीवर राहत असलेले ज्ञानेश्वर दत्तात्रय खाकाळ हे गुरूवारी सकाळी पत्नीसह कामानिमित्त अहिल्यानगर येथे गेले होते. तर त्यांची सात वर्षाची मुलगी ही घरी आजीजवळ होती. सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घराच्या अंगणात खेळत असताना दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी चिमुकलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चिमुकलीने घाबरून न जाता मोठ्या धाडसाने एकाच्या हाताला चाव घेत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर चिमुकलीने या धक्कादायक प्रकाराची माहिती आजीला दिली. आजीने शेजाऱ्यांना माहिती दिली असता ग्रामस्थांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. मात्र त्यांचा मागमूस लागला नाही. दरम्यान, ग्रामस्थ आणि पोलिसांनी घाबरून न जाता चिमुकलीने मोठ्या धाडसाने स्वतःची सुटका करून घेतल्याने तिचे कौतुक केले आहे.

पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन
याबाबत अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांना सांगितले की, या प्रकरणी अद्याप कोणी तक्रार दिली नाही. मात्र, आम्ही परिसरात व ठाणे हद्दीत संशयितांचा शोध घेत आहोत. नागरिकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष ठेवून दक्ष राहावे. कोणी संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा.

Web Title: Beed: Toddler bravely foils kidnapping plot; escapes by biting hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.