Beed: चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून दुसऱ्या बाजूच्या जीपवर धडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:47 IST2025-12-17T13:46:41+5:302025-12-17T13:47:17+5:30
लाखमापूर पाटीजवळ कार डिव्हायडरवर आदळून जीपवर आदळली; लातूरचे तिघे ठार, ८ जखमी!

Beed: चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून दुसऱ्या बाजूच्या जीपवर धडकली
अंबाजोगाई : अंबाजोगाई ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास लाखमापूर पाटीजवळ कार आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात लातूरचे तीनजण जागीच ठार झाले, तर आठजण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री भरधाव वेगाने लातूरकडून येणारी कार (क्र. एमएच १२ सीवाय ७०२२) अंबाजोगाईकडे येत होती. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार डिव्हायडरवर आदळून दुसऱ्या बाजूने लातूरकडे जात असलेल्या जीपवर (क्र. एमएच २४ सीवाय ४७७१) आदळली. या दुर्घटनेत कारमधील तीनजण जागीच ठार झाले. मृत व्यक्तींमध्ये अमित सुभाष राऊत (वय ३५, रा. आर्वी, लातूर), पृथ्वी रमाकांत जाधव (३०, रा. खानापूर, ता. रेणापूर) आणि नजीमोद्दीन फैजोद्दीन शेख (३७, रा. आर्वी, जि. लातूर) यांचा समावेश आहे. या घटनेत एकूण आठजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये असलेले वीरभद्र उमाकांत स्वामी (वय ४०), सरस्वती वीरभद्र स्वामी (३२), महेश रमाकांत स्वामी (३१), अश्विनी गंगासागर स्वामी (२८), गणेश रमाकांत स्वामी (२५), प्राची गंगासागर स्वामी (७) (सर्व रा. आरजखेडा, ता. रेणापूर, जि. लातूर) हे सर्वजण जखमी झाले. तसेच, दिशान इस्माईल सय्यद (वय २०, रा. काळे गल्ली, लातूर) आणि अरबाज रहमत शेख (२१, रा. रेणुका नगर, लातूर) यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.
सात वर्षांची प्राची गंभीर जखमी
बर्दापूरचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी प्राची स्वामी हिला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व जखमींना लातूरच्या रुग्णालयात पाठवले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविले होते. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिस व स्थानिक नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावले. कारमधील मृत बाहेर काढून गंभीर जखमींना लातूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.