बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:55 IST2025-01-31T16:54:37+5:302025-01-31T16:55:34+5:30
Beed Police : वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांवर बीड पोलीस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे.

बीडमध्ये एसपींची मोठी कारवाई; वाळू माफीयांना मदत करणाऱ्या पोलिसांना निलंबित केलं
Beed Police ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड पोलीस चांगलेच चर्चेत आले आहेत. नवे पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी सुत्रे हाती घेताच नवीन बदल केले आहेत. आता अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात त्यांनी मोठी कारवाई केली आहे. आता वाळू माफियांना मदत करणाऱ्या पोलिसांवर त्यांनी कारवाई केली आहे.
माझ्यावरील संकट आजचं नाही तर गेले ५३ दिवस...; धनंजय मुंडेंनी स्पष्ट सांगितले
अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणात आरोपींसोबत साटे लोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली आहे. गेवराई येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर कारवाई केली आहे.
मिळालेली माहिती अशी,सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश दिले होते. पण तरीही वाळूसह वाहन ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. तसेच गुन्हा दाखल करण्यासही विलंब केला. ही गोष्टी गुन्हेगारांना मदत करण्यासारखी आहे. यावर आता पोलीस अधिक्षकांनी मोठी कारवाई केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड पोलीस चर्चेत
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड पोलीस पुन्हा चर्चेत आले आहेत. वाल्मीक कराड याने आतापर्यंत बीड जिल्ह्यात आपल्या मर्जीतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या परळीत बदल्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याने पोलिसांवर दबाव आणून अनेकांवर गुन्हा दाखल केल्याचाही आरोप सुरू आहे.