Beed:पावसाळ्यात शाळा पाण्यात, विद्यार्थी मंदिरात! परळी तालुक्यातील वानटाकळी गावाची व्यथा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:56 IST2025-09-18T17:54:59+5:302025-09-18T17:56:30+5:30
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी उभारलेली ही शाळा आजही तग धरून आहे. मात्र प्रत्येक पावसाळ्यात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते.

Beed:पावसाळ्यात शाळा पाण्यात, विद्यार्थी मंदिरात! परळी तालुक्यातील वानटाकळी गावाची व्यथा!
परळी ( बीड) : सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाणी शिरले. परिणामी 140 विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले. पावसामुळे शाळा बंद करावी लागल्याने गुरुवारी हनुमान मंदिरात वर्ग भरवावे लागले. गेल्या सात वर्षांत तीन वेळा शाळेत पाणी घुसले असून, आठ-आठ दिवस शाळा मंदिरात किंवा समाजमंदिरात हलवावी लागल्याची वेळ आली आहे.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी उभारलेली ही शाळा आजही तग धरून आहे. मात्र प्रत्येक पावसाळ्यात विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शाळेचे स्थलांतर करणे आणि नव्या स्लॅब इमारतीची उभारणी करणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी सरपंच गंगाबाई हंगे यांच्या वतीने राजू हंगे यांनी केली. या संदर्भात वरिष्ठांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे, परंतु आजवर शाळेचे स्थलांतर झालेले नाही, अशी खंत शाळेचे मुख्याध्यापक दत्ता हरी कवडेवाड यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील नागापूर जिल्हा परिषद गटातील वानटाकळी गावाजवळून वाहणाऱ्या. वाण नदीच्या पुरामुळे गावकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. नदीकाठी संरक्षणभिंत नसल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी सोमवारी पहाटे पाणी थेट गावात घुसले आणि ग्रामस्थांची प्रचंड तारांबळ उडाली. पुरामुळे वानटाकळीतील २०० हेक्टर जमीन खरचटून गेली आहे आणि पिकांची नासाडी झाली आहे. पूलही वाहून गेला आहे या पुलावरून वानटाकळीच्या ग्रामस्थांना वाहतूक करणे मुश्किलीचे झाले आहे. दरम्यान, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी अतिवृष्टी भागात दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी वानटाकळी गावाला भेट दिली आहे.
शाळा स्थलांतरीत करावी
वाण नदीकाठी संरक्षणभिंत नसल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी पाणी थेट वानटाकळी गावामध्ये घुसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच पूलाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूररेषेतील वानटाकळी जिल्हा परिषद शाळा संकटात आली आहे. शाळा स्थलांतराची गरज तातडीची आहे.
- प्रदीप मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, नागापूर गट