बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:35 IST2025-03-20T13:34:22+5:302025-03-20T13:35:03+5:30

विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे.

Beed police take action; After Walmik Karad, Athawale, MCOCA ACT on Ashti's Bhosale gang | बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

बीड पोलिसांची कारवाई; वाल्मीक कराड, आठवले यानंतर आष्टीच्या भोसले गँगवर मकोका

बीड : वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, बीडची आठवले गँग, यानंतर आता आष्टीच्या भोसले गँगवर मकोका लावण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांत अशा प्रकारच्या तीन कारवाया केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.

आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजिनाथ विलास भोसले, भरत विलास भोलसे, या दोन सख्ख्या भावांचा खून करून कृष्णा भोसले याला गंभीर जखमी केल्याची घटना १६ जानेवारी २०२५ रोजी वाहिरा येथे घडली होती. याप्रकरणी अजिनाथची पत्नी चिब्बा (वय ३०) हिच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यातील सहा आरोपींना अटकही केली होती. त्यानंतर अंभोरा पोलिसांनी या सर्व आरोपींच्या गुन्ह्यांची माहिती काढून मकोकाचा प्रस्ताव तयार केला. १० मार्च रोजी हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे आला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी तो शिफारशीसह छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांना पाठविला. त्यांनी १९ मार्च रोजी याला मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे आता पहिल्या खुनाच्या गुन्ह्यात मकोकाचे कलम वाढविण्यात आले आहे. याचा पुढील तपास हा आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे हे करत आहेत.

...अशी आहेत आरोपींची नावे
दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले (वय ३५, रा. वाहिरा, ता. आष्टी), सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, (वय ३५, रा. घु. पिंपरी, ता. आष्टी), मुद्दसर मन्सूर पठाण (वय ३८, रा. कानडी खुर्द, ता. आष्टी), सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले (वय ४०), शशिकला दीपक भोसले (वय ३५) व संध्या कोहिनूर भोसले (वय २१, सर्व रा. वाहिरा, ता. आष्टी), असे सहा आरोपी अटक आहेत. आणखी तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

...यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, मुकेश एकशिंगे, केदार, सपोउपनि अभिमन्यू औताडे, नीलेश ठाकूर, बिभीषण चव्हाण आदींनी केली आहे.

आणखी एक टोळी निशाण्यावर
पोलिसांनी २०२५ या वर्षात तीन टोळ्यांवर मकोका लावला आहे. आणखी एक टोळी पोलिसांच्या निशाण्यावर आहे. त्यांची सर्व कुंडली सीसीटीएनएस विभागातून काढण्यात आली आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करून लवकरच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Beed police take action; After Walmik Karad, Athawale, MCOCA ACT on Ashti's Bhosale gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.