बीडमध्ये पोलीस उन्नती दिनानिमित्त फिर्यादींना ८ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 04:47 PM2019-01-04T16:47:48+5:302019-01-04T16:50:11+5:30

बीड पोलिसांच्या वतीने विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमातून परत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

Beed police returns 8 lakhs issues to owner in a Police Unnati Day program | बीडमध्ये पोलीस उन्नती दिनानिमित्त फिर्यादींना ८ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

बीडमध्ये पोलीस उन्नती दिनानिमित्त फिर्यादींना ८ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

Next

बीड : चोरी, घरफोडी, दरोडा, लूटमार यात चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांनी तपास करुन मिळवला. हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलीस दलाच्या वतीने सन्मानपूर्वक परत करण्यात आला. पोलीस उन्नती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात तब्बल ८ लाख रुपयांचा मुद्देमाल परत केला. यात दुचाकी, ट्रॅक्टर, दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश होता.

मागील वर्षभरापासून बीड पोलिसांच्या वतीने विविध गुन्ह्यात हस्तगत केलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सार्वजनिक कार्यक्रमातून परत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आतापर्यंत ११ कार्यक्रम घेतले. शुक्रवारी पोलीस उन्नती दिनानिमित्त १२ वा कार्यक्रम घेण्यात आला. ११ पोलीस ठाण्यांमधील घरफोडी, चोरी, लूटमार यासारख्या १९ गुन्ह्यांमधील ८ लाख ६ हजार १५१ रुपयांचा मुद्देमाल संबंधितांना परत केला. यावेळी मुरलीधर रत्नपारखी, प्रल्हाद चौधरी, नारायण भोंडवे, अजय वाघमारे यांनी पोलिसांबद्दलचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कुलबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे, सपोनि शीतलकुमार बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. पो. ह. राम यादव, बाबासाहेब डोंगरे, गणेश हंगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सपोनि दिलीप तेजनकर केले. आभार उपअधीक्षक खिरडकर यांनी मानले.

१७३ फिर्यादींना ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल परत
आतापर्यंत बीड पोलिसांनी १७१ गुन्ह्यातील १७३ फिर्यादींना तब्बल ७१ लाख ३८ हजार ९३८ रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे. यासाठी संबंधित ठाणे प्रभारी व क्राईम मोहरीर यांचे योगदान सर्वाधिक आहे.

गुन्हे उघड करणे कसरतीचे
अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या हाती कसलाच सुगावा नसतो. यावेळी तपास करणे कसरतीचे ठरते. मात्र, मेहनत, जिद्द व कौशल्याच्या बळावर बीड पोलिसांनी ते सहज शक्य केले आहे. यापुढेही प्रत्येक गुन्हा उघड करुन मुद्देमाल फिर्यादींना परत केला जाईल, असे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे यांनी सांगितले.

चित्रपटातील पोलिसांशी तुलना नको
चित्रपटातील सिंघम पोलीस वेगळे असतात अन् खरे पोलीस वेगळे आहेत. नागरिकांनी त्यांच्याशी तुलना करु नये. पोलिसांना सहकार्य करा. त्यांच्यावर विश्वास ठेवा. चित्रपटापेक्षाही चांगले काम रस्त्यावर उभा राहून काम करणाऱ्या खऱ्या पोलिसांचे आहे. बोलणे सोपे असते मात्र करणे अवघड असते. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपले काम प्रामाणिकपणे पार पाडा. जनतेच्या रक्षणासाठीच आम्ही उभा आहोत. अशा कार्यक्रमांमुळे जनता व पोलीस यांच्यातील सलोख्याचे नाते अधिक घट्ट होईल हाच हेतू आहे. यापुढेही असे कार्यक्रम अखंडितपणे सुरु राहतील, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

Web Title: Beed police returns 8 lakhs issues to owner in a Police Unnati Day program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.