गेवराई : जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत. गेवराई पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणातील आरोपीला मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई गेवराई शहरात शनिवारी पावणे सात वाजता करण्यात आली. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
विजय दिगंबर आघाव असे लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. शनिवारी सकाळीच पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी आणि तपासकामात त्याला मदत करण्यासाठी हवालदार विजय आघाव याने लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचून गेवराई शहरात पावणे सात वाजता हवालदार आघाव याला २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्ठमपल्ले यांच्यासह पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईला चिट्टमपल्ले यांनीही दुजोरा दिला आहे.
नियुक्ती होताच ट्रॅपया कारवाईचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अवघ्या दोनच दिवसांपूर्वी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांची बदली बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली होती. त्यांच्या जागी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला होता. नवीन निरीक्षकांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही मोठी कारवाई झाली. पोलीस निरीक्षक बांगर हे दोन वर्षे गेवराई ठाण्यात कार्यरत होते, पण त्यांच्या काळात गेवराई ठाण्यात एकही लाचखोरीचा ट्रॅप झाला नव्हता. मात्र, आता नवीन निरीक्षकांच्या कारकिर्दीत दुसऱ्याच दिवशी हवालदार लाच घेताना पकडल्याने पोलीस दलातील भ्रष्टाचाराची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
किशाेर पवार यांचे काय?यापूर्वी पाटोदा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने वाळूचे वाहन चालू देण्यासाठी लाच घेतली होती. तेव्हा पाटोद्याचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात आणले होते. आता किशोर पवार हे रूजू होताच दुसऱ्याच दिवशी एसीबीची कारवाई झाली. त्यामुळे पवार यांचीही उचलबांगडी होणार की त्यांना मोकळीक देणार, याकडे लक्ष लागले आहे.
Web Summary : A police constable in Gevrai was arrested for accepting a 20,000-rupee bribe to aid an accused in an illegal sand transportation case. The Anti-Corruption Bureau (ACB) conducted the operation, exposing corruption within the police force soon after a new inspector took charge.
Web Summary : गेवराई में एक पुलिस कांस्टेबल को अवैध रेत परिवहन मामले में एक आरोपी की मदद करने के लिए 20,000 रुपये की रिश्वत लेते हुए गिरफ्तार किया गया। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो (एसीबी) ने कार्रवाई की, एक नए निरीक्षक के पदभार संभालने के तुरंत बाद पुलिस बल के भीतर भ्रष्टाचार का पर्दाफाश किया।