Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला असून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी आता यंत्रणांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यासह ८ आरोपींविरोधात सीआयडीकडून बीडमधील विशेष मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. तब्बल १४०० पानी आरोपपत्राच्या माध्यमातून आरोपींनी केलेल्या दुष्कृत्याचा लेखाजोखा सीआयडीकडून कोर्टासमोर मांडण्यात येणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या प्रकरण्यात आली होती. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र देशमुख कुटुंबियांसह राज्यभरातील जनतेच्या आक्रोशातून निर्माण झालेल्या दबावामुळे तपासाची चक्रे फिरली अन् काही आरोपी स्वत:हून हजर झाले तर पोलिसांकडून काहींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या आरोपींना कोर्टाच्या माध्यमातून कठोर शिक्षा होण्यासाठी यंत्रणांकडून सादर केले जाणारे आरोपपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. आरोपींनी नेमकी कशा प्रकारे देशमुख यांची हत्या केली, कोणत्या आरोपीची काय भूमिका होती, त्याबाबतचे कोणते पुरावे तपास यंत्रणांकडे आहे, हे आरोपपत्राच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.
ग्रामस्थांकडून १० दिवसांचा अल्टिमेटम
संतोष देशमुख हत्या प्रकरणी ९ मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात, यासाठी मंगळवारपासून देशमुख कुटुंबीय व ग्रामस्थांनी सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. बुधवारी दुपारी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या लेखी आश्वासनाचे पत्र अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान हे आंदोलन मागे घेण्यात आले; परंतु त्यासाठी आणखी १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमसरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अॅड. बाळासाहेब कोल्हे हे सहायक विशेष सरकारी वकील असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्वीट करून ही माहिती दिली. देशमुख कुटुंब व ग्रामस्थांची मागणी सरकारने मागणी मान्य केली.