फिल्मी कथाही फिकी! ३२ वर्षांपासून बेपत्ता प्रकाश घरी परतला; स्मृतिभ्रंश असूनही ७ देशांची सफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 20:23 IST2026-02-27T20:23:00+5:302026-02-27T20:23:29+5:30
एका पत्राने संपवला ३२ वर्षांचा वनवास; १९९३ मध्ये नाशिकमधून बेपत्ता; रशिया, दुबई, युरोप फिरून ‘प्रकाश’ परतला आपल्या घरी

फिल्मी कथाही फिकी! ३२ वर्षांपासून बेपत्ता प्रकाश घरी परतला; स्मृतिभ्रंश असूनही ७ देशांची सफर
बीड : चित्रपटालाही लाजवेल, असा एक थरारक आणि भावनिक प्रवास बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील केकत पांगरी (हरिलाल नाईक तांडा) येथे पाहायला मिळाला आहे. तब्बल ३२ वर्षांपूर्वी घराबाहेर पडलेला आणि स्मृतिभ्रंशामुळे जगभर भटकंती केलेला प्रकाश जनार्दन जाधव हा तरुण २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सुखरूप आपल्या घरी परतला. ३२ वर्षांची दीर्घ प्रतीक्षा संपल्याने जाधव कुटुंबासह संपूर्ण तांड्यावर आनंदाश्रूंचा पूर आला आहे.
मूळचे केकत पांगरी येथील जनार्दन वाचू जाधव यांचे प्रकाश हे एकुलते एक पुत्र. १९९३ मध्ये नाशिकमध्ये कामाला असताना प्रकाश घरातून निघून गेले. सुरुवातीचे काही महिने नाशिक, गोवा आणि पुणे येथे घालवल्यानंतर १९९७ मध्ये दिल्लीला जात असताना रेल्वेमध्ये त्यांच्यासोबत मोठी लूटमार झाली. या धक्क्यामुळे प्रकाश यांची स्मृती गेली. नाव, गाव आणि ओळखीचा कोणताही पुरावा शिल्लक नसताना त्यांनी तब्बल २० वर्षे दिल्लीत काढली.
स्मृती हरवलेली असताना जागतिक सफर
स्मृती गेलेली असतानाही प्रकाश यांनी कामाच्या निमित्ताने सिंगापूर (१.५ वर्ष), रशिया (२ वर्षे), दुबई, अबूधाबी आणि थायलंड अशा विविध देशांत वास्तव्य केले. कोरोना काळानंतर ते दुबई आणि इस्तंबूलमार्गे युरोपमधील माल्टा येथे पोहोचले. नियतीला कदाचित त्यांना पुन्हा घरी आणायचे होते, म्हणूनच डिसेंबर २०२४ मध्ये माल्टा येथे त्यांना ‘ब्रेन स्ट्रोक’चा त्रास झाला. या गंभीर आजारपणातच त्यांची गेलेली स्मृती अचानक परत आली आणि त्यांना आपल्या गावाची, कुटुंबाची आठवण झाली.
एका पत्राने संपवला ३२ वर्षांचा वनवास
स्मृती परत आल्यानंतर माल्टा येथून १६ एप्रिल २०२५ रोजी एक पत्र त्यांचे काका छगन वाचू जाधव यांच्या नावाने केकत पांगरी येथे पोहोचले. या पत्राने मोठी खळबळ उडाली. पत्रातील माहितीनुसार काकांचा मुलगा सुभाष जाधव (प्राथमिक शिक्षक, सिल्लोड) यांनी तातडीने प्रकाश यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि खात्री पटली की ३२ वर्षांपासून हरवलेला आपला भाऊ जिवंत आहे.
तांड्यावर दिवाळी साजरी!
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाश अखेर आपल्या घरी परतले. त्यांचे काका छगन जाधव, भाऊ सुभाष जाधव, चार बहिणी आणि नातेवाइकांनी प्रकाश यांचे जंगी स्वागत केले. हरिलाल नाईक तांडा, रामनगर तांडा आणि केकत पांगरी परिसरात या घटनेची चर्चा असून ३२ वर्षांनंतर आई-वडिलांच्या डोळ्यांतील अंधार दूर होऊन ‘प्रकाश’ पुन्हा घरी आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
३२ वर्षांच्या प्रवासाचा ‘मॅप’
सुरुवात (१९९३) : नाशिक येथून बेपत्ता.
घातामुळे स्मृतिभ्रंश (१९९७) : दिल्लीत रेल्वेमध्ये लूटमार, स्मृती गेली.
जागतिक प्रवास : नेपाळ, सिंगापूर, रशिया, दुबई, अबूधाबी, थायलंड.
युरोप दर्शन : कोरोनानंतर माल्टा देशात वास्तव्य.
टर्निंग पॉइंट : ब्रेन स्ट्रोकमुळे स्मृती परतली (डिसेंबर २०२४).
पुनर्भेट : २२ फेब्रुवारी २०२६ रोजी केकत पांगरी येथे आगमन.