Beed: बिबट्याने दोन घोड्यांसह १६ जनावरांचा पाडला फडशा, दहशतीने गावांत सामसूम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:01 IST2025-09-04T11:59:32+5:302025-09-04T13:01:57+5:30
डोंगराळ भागात मुक्तसंचार, ग्रामस्थांची उडाली झोप; अंबाजोगाई तालुक्यातील प्रकार

Beed: बिबट्याने दोन घोड्यांसह १६ जनावरांचा पाडला फडशा, दहशतीने गावांत सामसूम
अंबाजोगाई : तालुक्यातील मांडवा पठाण गावात बिबट्याची दोन दिवसांपासून दहशत पसरली आहे. डोंगराळ भागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून, त्याने दोन गायी, पाच बैल, एक वासरू, तीन वगार, दोन शेळ्या, दोन घोडे आणि एक कुत्रा, अशा तब्बल १६ जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी गावांमध्ये सामसूम पसरली आहे. ग्रामस्थांची झोप उडाली असून, लहान मुलांना घराबाहेर काढण्यासही पालक घाबरत आहेत. वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी गावात त्वरित पिंजरे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
या शेतकऱ्यांचे झाले नुकसान
या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये बाबुराव रुद्राक्ष (गाय), बळीराम आकुसकर (दोन बैल), नवनाथ रुद्राक्ष (बैल), संभाजी रुद्राक्ष (गाय), छाया रुद्राक्ष (वासरू), सचिन जोगदंड (शेळी), गणपत जाधव (शेळी), सोमनाथ रुद्राक्ष (वगार), बाजीराव घाडगे (बैल), राहुल जोगदंड (वगार), विनोद जोगदंड (बैल), गणेश इरे (दोन घोडे), नितीन जोगदंड (कुत्रा), आणि चंद्रकांत चौरे (वगार) यांचा समावेश आहे.