Beed: जंगल सोडून बिबट्याचा थेट शेतकऱ्याच्या घराजवळ दबा; 'गुरगुर' ऐकून कुटुंबीय हादरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:30 IST2025-11-27T12:29:48+5:302025-11-27T12:30:40+5:30
बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकून शेतकरी कुटुंब सतर्क झाले

Beed: जंगल सोडून बिबट्याचा थेट शेतकऱ्याच्या घराजवळ दबा; 'गुरगुर' ऐकून कुटुंबीय हादरले!
- नितीन कांबळे
कडा (बीड): आजपर्यंत जंगल, डोंगर आणि शेतांमध्ये वावर असणाऱ्या बिबट्याने आता थेट लोकवस्तीजवळ आणि घराजवळ दर्शन देणे सुरू केल्यामुळे आष्टी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री चक्क पिंपरी घाटा येथील शेतकरी विठ्ठल वायभासे यांच्या घराजवळ बिबट्याने दबा धरून बसल्याचा थरारक अनुभव ग्रामस्थांनी घेतला. बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकून शेतकरी कुटुंब सतर्क झाले आणि वेळीच त्यांनी टॉर्च मारल्याने मोठी दुर्घटना टळली.
आष्टी तालुक्याला अहमदनगर जिल्ह्याची सीमा लागून असल्याने आणि मोठ्या वनपरिक्षेत्रामुळे बिबट्याचा वावर सातत्याने सुरू असतो. यापूर्वी बिबट्याने शेळ्या, वासरे आणि शेकडो पाळीव श्वानांचा फडशा पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी दुपारी अरणविहरा येथे एका शेळीचा फडशा पाडल्यानंतर, रात्री बिबट्याने पिंपरी घाटा येथील शेतकरी विठ्ठल वायभासे यांच्या घराच्या अगदी जवळ दर्शन दिले.
शेळी, वासरे खाल्यानंतर आता बिबट्याचा लोकवस्तीत घातला दबा; बीडच्या आष्टीतील 'धापा टाकणाऱ्या बिबट्या'चा व्हिडिओ व्हायरल! #leopard#beed#FORESTpic.twitter.com/Yk6mNGaz1N
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 27, 2025
थरारक व्हिडिओ व्हायरल
रात्रीच्या वेळी घराजवळील शेतात बिबट्या गुरगुरल्याचा सारखा आवाज येत असल्याने शेतकरी कुटुंब सतर्क झाले. त्यांनी बॅटरीचा टॉर्च मारला असता, एक बिबट्या धापा टाकत दबा धरून बसल्याचे समोर आले. कुटुंबातील काही लोकांनी त्याचा व्हिडिओ काढला असून, तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एखादी दुर्दैवी घटना घडू शकते!
जंगलात, शेतात वावरणारा बिबट्या आता लोकवस्तीत येऊ लागल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने केवळ पाहणी आणि पंचनामा करण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यामुळे शेतकरी आता शेताकडे जाण्यासही धजावत नाहीत.
नागरिकांची झोप उडाली
बिबट्याच्या या वाढत्या दहशतीमुळे आष्टी तालुक्यातील नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. "बिबट्या आता थेट लोकवस्तीत येऊ लागला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा," अशी मागणी येथील समाजसेवक प्रा. अंकुश तळेकर यांनी केली आहे.