Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 18:30 IST2025-08-25T18:30:07+5:302025-08-25T18:30:49+5:30
हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
बीड: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला करून गाडीवर दगडफेक झाल्याची घटना आज दुपारी साडेपाच वाजेच्या दरम्यान गेवराईमध्ये छत्रपती शिवाजी चौकात घडली. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती असून यामुळे हाके आणि पंडित समर्थक समोरासमोर येऊन काही काळ तणाव निर्माण झाला होता.
गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या सहकाऱ्यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्या समर्थनाथ गेवराईमध्ये बॅनर लावले होते. यावरून बीड दौऱ्यावरील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दोन दिवसांपूर्वी आमदार पंडित यांच्यावर टीका केली. त्यानंतर आज बीडकडे जात असताना छत्रपती शिवाजी चौकात हाके थांबले होते. यावेळी आमदार पंडित समर्थक अचानक आक्रमक झाले. त्यांनी हाके यांच्यावर हल्ला चढवला, मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली. त्यानंतर हाके आणि पंडित समर्थक समोरसमोर आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत हाके यांना बीडच्या दिशेने पुढे रवाना केले.
जेथे पुतळा जाळला तेथेच हल्ला
आमदार पंडित यांच्यावर टीका केल्याने रविवारी याचा चौकात हाके यांचा पुतळा जाळण्यात आला होता. त्यानंतर आज कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्याच चौकात पोहचले होते. चौकात खाली उतरून कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत असतानाच हाके यांच्यावर आमदार पंडित यांचे कार्यकर्ते धावून आले. हाके यांच्या गाडीवर चढून हल्ला करण्यात आला. मात्र, पोलिस आणि हाके समर्थकांनी वेळीच धाव घेतली. हाके यांना गाडीत बसवून तेथून रवाना करण्यात आले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
हाके समाजात तेढ निर्माण करत आहेत
समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटिल कारस्थान हाके बीड जिल्ह्यात येऊन करत आहेत. अतिशय खालच्या पातळीवर माझ्यावर टीका करण्यात आली. यावर मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आज माझ्या सहकाऱ्यांनी हाके यांच्या क्रियेवर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या सहकाऱ्यांनी जरांगे यांचे समर्थनार्थ बॅनर लावले तर काय अडचण आहे.
- विजयसिंह पंडित, आमदार, गेवराई
मुख्यमंत्री सुरक्षित नाहीत, आमचे काय
मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका करण्यात येत आहे. मुंबईकडे मोठा लोंढा निघाला आहे, परिस्थिती कठीण आहे. माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला.
- लक्ष्मण हाके, ओबीसी नेते