बीड कारागृह अधीक्षकांचा नवा कारनामा! गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून गाडी धुणे, वैयक्तिक कामे

By सोमनाथ खताळ | Updated: September 9, 2025 13:55 IST2025-09-09T13:50:36+5:302025-09-09T13:55:02+5:30

बीड येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड पुन्हा अडचणीत; झाडे तोडल्यानंतर आता कैद्यांकडून वैयक्तिक कामे केल्याचा आरोप.

Beed Jail Superintendent Petric Gaikwad's new feat! Car washing, personal chores by a prisoner convicted of a serious crime | बीड कारागृह अधीक्षकांचा नवा कारनामा! गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून गाडी धुणे, वैयक्तिक कामे

बीड कारागृह अधीक्षकांचा नवा कारनामा! गंभीर गुन्ह्यातील कैद्याकडून गाडी धुणे, वैयक्तिक कामे

बीड : येथील मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड हे विनापरवाना झाडे तोडल्याने वादात दोन दिवसांपूर्वीच सापडले असतानाच त्यांचा आणखी एक कारनामा मंगळवारी समोर आला आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून घरातील कामे, कपडे वाळविण्यासह वाहनही धूत असल्याचे उघड झाले आहे. त्याचाच एक व्हिडीओ हाती लागला असून, कैद्याकडून वैयक्तिक कामे करून घेतल्याने गायकवाड अडचणीत सापडले आहेत. यापूर्वीही गायकवाड यांचे जळगावला असताना निलंबन झाले होते.

शिक्षा झालेल्या कैद्यांकडून कारागृहाच्या अधीक्षकांना कोणतीही वैयक्तिक कामे करून घेता येत नाहीत. कैद्यांना फक्त कारागृहातील नियमांनुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार कामे नेमून दिली जातात. भारतीय तुरुंग नियमांनुसार, कैद्यांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसार विविध कामे दिली जातात. यामध्ये कारागृहातील स्वच्छता, बागकाम, स्वयंपाकघरातील कामे, फर्निचर बनवणे, कापड विणणे, बेकरी उत्पादने तयार करणे यांचा समावेश आहे. ही कामे कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना व्यावसायिक कौशल्ये शिकवण्यासाठी असतात. मात्र, गायकवाड यांनी मनमानी करत कैद्यांकडून चक्क वैयक्तिक कामे केल्याचे उघड झाले आहे. कैद्यांना दिली जाणारी कामे ही त्यांचे पुनर्वसन आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आणण्याच्या उद्देशाने असतात, त्यांचे शोषण करण्यासाठी नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

नियम काय सांगतो

कारागृह अधीक्षक एखाद्या कैद्याकडून वैयक्तिक कामे (उदा. त्यांच्या घरात साफसफाई करणे, खासगी गाडी धुणे किंवा इतर वैयक्तिक सेवा) करून घेत असेल, तर ते कायद्याचे उल्लंघन आहे. अशा प्रकरणात तुरुंग कायदा आणि तुरुंग नियमानुसार फौजदारी गुन्हा किंवा शिस्त भंगानुसार निलंबन, बडतर्फी किंवा इतर शिक्षा होऊ शकतात. हे नियम कैद्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि तुरुंग प्रशासनात पारदर्शकता राखण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

गायकवाडविरोधात महिलांच्याही तक्रार
पेट्रस गायकवाड यांच्याविरोधात धुळे येथे असतानाही काही महिलांनीच तक्रारी केल्या होत्या. त्यातही गायकवाड अडचणीत आले होते. बीडमध्ये अशीच परिस्थिती असून, महिला भीतीपोटी समोर येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

भरदुपारी धुतले वाहन
गायकवाड यांचे वाहन (कार क्र.एमएच २७ बीव्ही ९५१७) कारागृह परिसरातील परिसरातील पार्किंगमध्ये उभे असते. हेच वाहन सचिन कदम हा कैदी पाणी मारून स्वच्छ करतानाचा प्रकारही उघड झाला आहे. तसेच हाच आरोपी घरातील कामे करत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

उपमहानिरीक्षकांकडून चौकशी, जेलर गप्प
झाडे तोडल्याच्या प्रकरणात चौकशी केल्याचे छत्रपती संभाजीनगरचे उपमहानिरीक्षक नितीन वायचाळ यांनी सांगितले, तर पेट्रस गायकवाड यांनी बोलणे टाळले.

Web Title: Beed Jail Superintendent Petric Gaikwad's new feat! Car washing, personal chores by a prisoner convicted of a serious crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.