Beed: शिक्षण क्षेत्रात खळबळ! शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, भगवान फुलारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:14 IST2025-11-20T13:13:21+5:302025-11-20T13:14:55+5:30
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी १९ नाव्हेंबरला हे आदेश दिले.

Beed: शिक्षण क्षेत्रात खळबळ! शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, भगवान फुलारी निलंबित
बीड : येथील माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी व सध्याचे लातूर येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि बीड येथील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी १९ नाव्हेंबरला हे आदेश दिले. या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदे व फुलारी हे कार्यरत असताना प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडून काही प्रकरणात अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले. या चौकशीचा अंतरिम अहवाल समितीने पुणे येथील शिक्षण आयुक्तांना १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केला. त्यात शिक्षण आयुक्तांनी शिंदे व फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केली. त्यानुसार प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोटकलम (१) (अ) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून शिक्षणाधिकारी (प्रा.) नागनाथ शिंदे व शिक्षणाधिकारी (प्रा.) भगवान फुलारी यांना १९ नोव्हेंबरला निलंबित केले. आदेश अंमलात असेल त्या कालावधीपर्यंत शिंदे यांचे लातूर कार्यालय व फुलारी यांना बीड कार्यालय मुख्यालय राहणार आहे.
नागनाथ शिंदे व भगवान फुलारी यांच्याविरुद्ध शासनस्तरावर, क्षेत्रीय स्तरावर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालकांकडून काही प्रकरणाची चौकशी, वैयक्तिक मान्यता प्रकरणांच्या सुनावणीची कार्यवाही सुरु आहे. त्यानुषंगाने दोघांविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे.