Beed: अभिलेखे कक्षाचे प्रमुख एसीबीच्या रडारवर; सफाई कामगाराकडे जबाबदारी कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:02 IST2025-12-11T18:01:21+5:302025-12-11T18:02:13+5:30
बीड पालिका लाच प्रकरणात 'ट्विस्ट'; 'काळे' कारनाम्यांसाठी विभाग प्रमुख अडचणीत

Beed: अभिलेखे कक्षाचे प्रमुख एसीबीच्या रडारवर; सफाई कामगाराकडे जबाबदारी कशी?
बीड : बीड नगर पालिकेमध्ये गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी सफाई कामगार आशिष मस्के याला १ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईत रात्री उशिरा आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. मस्के याच्यासोबत लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पाबळे नामक खासगी व्यक्तीला सहआरोपी करण्यात आले असून, तो सध्या फरार आहे.
या कारवाईतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, सफाई कामगार असलेल्या आशिष मस्के याच्याकडे कसलेही अधिकृत आदेश नसताना त्याला पालिका अभिलेखे कक्षात कामाची जबाबदारी कशी देण्यात आली? राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सहकार्यानेच तो या कक्षात कार्यरत होता. त्यामुळे, ज्या विभागप्रमुखाने आदेश नसतानाही कामगाराला ही जबाबदारी दिली, ते आता थेट एसीबीच्या रडारवर आले आहेत.
'काळे' कारनाम्यांना जबाबदार कोण?
अभिलेखे कक्षात यापूर्वीही पैशांसाठी अनेकदा लोकांची अडवणूक झाल्याचे आरोप आहेत. या विभागात एवढे 'काळे' कारनामे सुरू असतानाही आणि कामगारासारखा व्यक्ती लाचखोरीतून 'चंद्रा'वर पोहोचलेला असताना, त्याकडे कोणी दुर्लक्ष केले, असा सवाल उपस्थित होत आहे. आता या लाचेच्या कारवाईत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास एसीबीकडून केला जाणार असून, विभागप्रमुखांसह सत्यप्रतवर सह्या करणारे अधिकारीही अडचणीत आले आहेत.
अविनाश धांडे आत्महत्येचे प्रकरण शांत
याच पालिकेतील वसुली विभागातील कर्मचारी अविनाश धांडे यांनी आत्महत्या केल्यानंतर, मृत्यूपूर्वी त्यांनी आरोप केलेल्या व्यक्तींची अद्यापही पोलिसांनी चौकशी केलेली नाही. या आरोपींना 'लाख'मोलाचे सहकार्य करण्यासाठी काही राजकीय व्यक्ती धावपळ करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. बीड शहर पोलीस मात्र या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.
एकजण फरार
आशिष मस्के सोबत पाबळे नामक खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याने लाचेसाठी प्रोत्साहन दिले असून, तो सध्या फरार आहे. या प्रकरणात तपासात ज्यांच्यावर संशय वाटेल, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल.
- सोपान चिट्टमपल्ले, उपअधीक्षक एसीबी बीड