टाकरवणच्या ZP शाळेत संगणक लॅबसह प्रयोगशाळा; २२ लाखांच्या लोकवर्गणीने 'हायटेक' लुक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:50 IST2026-01-27T16:45:48+5:302026-01-27T16:50:02+5:30
बीडच्या 'टाकरवण'चा डंका! लोकवर्गणीतून २२ लाखांचा निधी उभारून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट; खासगी शाळांनाही पडेल भुरळ

टाकरवणच्या ZP शाळेत संगणक लॅबसह प्रयोगशाळा; २२ लाखांच्या लोकवर्गणीने 'हायटेक' लुक!
टाकरवण ( बीड) :बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतलेल्या पुढाकारातून शिक्षक आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे या शाळेचा कायापालट केला आहे. लोकवर्गणीतून तब्बल २२ लाख रुपयांचा निधी उभारून या सर्वांनी शाळेत आवश्यक शैक्षणिक सुविधांसह इतर उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागांतील अशा शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
चर्चा, नियोजन आणि अंमलबजावणी...
अपुऱ्या सोयीसुविधा आणि देखभालीअभावी खरे तर ही शाळाच बंद पडण्याच्या मार्गावर होती. पंरतु, मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले रत्नाकर वाघमारे यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेत विविध उपक्रम राबवायला सुरुवात केली. मुख्याध्यापक, शिक्षक, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती असे सारेच एकत्र आले. चर्चेतून नियोजन ठरले आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली.
पाहता पाहता जमले २२ लाख
मुख्याध्यापक वाघमारे यांनी गावकऱ्यांना सातत्याने शाळेच्या अवस्थेबाबत जाणीव करून देत सुधारणांसाठी प्रेरणा दिली. मग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ लव्हाळे यांनी पुढाकार घेतला आणि गावकरीही सरसावले. कुणी शंभर, कुणी हजार, कुणी महिन्याची बचत शाळेसाठी दिली आणि पाहता पाहता लोकवर्गणीतून तब्बल २२ लाख रुपयांचा निधी जमा झाला.
संगणक कक्षासह प्रयोगशाळाही सज्ज
लोकवर्गणीतून जमलेला निधी अगदी नियोजनपूर्वक वापरून या शाळेचा चेहरामोहराच बदलला आहे. केवळ रंगरंगोटीपुरते मर्यादित न राहता शाळेत आता संगणक कक्ष, विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा सज्ज झाली आहे. परिसरात वृक्षारोपणासोबत नटलेली सेंद्रीय परसबाग आता सर्वांनाच आकर्षित करीत आहे. शिवाय वर्गखोल्यांना कल्पकतेने दिलेली नावे, विद्यार्थ्यांच्या चप्पल-बूटांसाठी स्वतंत्र स्टँड, शिक्षकांसाठी ठरवून दिलेला गणवेष अशा उपक्रमांतून एक शिस्त लागली आहे.
आता अभ्यासाकडे लक्ष
आवश्यक सुविधांसाठी राबवलेल्या उपक्रमानंतर मुख्याध्यापक-शिक्षकांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. अभ्यासपद्धतीत कृतिशील अभ्यासक्रमावर भर दिला. शाळा हे ओझे नाही, तर आनंद लुटण्याची जागा असल्याची भावना मुलांमध्ये निर्माण झाली. पालक-ग्रामस्थांसाठीही ही शाळा आता गावाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक ठरली आहे.
आशेचा नवा किरण
नवे अभ्यासक्रम, नव्या धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा परिषद शाळांबद्दल असलेली अनास्था, शैक्षणिक निधीत वारंवार होणारी कपात, शिक्षक भरतीवरील मर्यादा, शाळेसाठी दिला जाणारा अपुरा निधी यातून निर्माण होणाऱ्या दुरवस्थेत टाकरवणची ही शाळा मात्र आदर्श ठरली आहे. आधुनिक काळात खासगी तसेच इंग्रजी शाळांचे आकर्षण, भरमसाठ शुल्क भरण्यासाठी पालकांची होणारी ससेहोलपट आणि ओस पडत चाललेल्या जि. प. शाळा पाहता टाकरवणची ही शाळा शिक्षक, विद्यार्थी, गावकरी आणि प्रशासनासाठीही आशेचा किरण ठरली आहे.