Maharashtra HSC result 2018: बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पुन्हा लेकीच भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:49 IST2018-05-30T23:49:05+5:302018-05-30T23:49:05+5:30
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष कायम ठेवला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.०८ टक्के एवढा लागला.

Maharashtra HSC result 2018: बीड जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत पुन्हा लेकीच भारी
बीड : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल बुधवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुलीच भारी राहिल्या. गतवर्षीही मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही त्यांनी हा विजयी जल्लोष कायम ठेवला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.०८ टक्के एवढा लागला. औरंगाबाद विभागात बीड तिसऱ्या स्थानावर आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान औरंगाबाद विभागात बीड जिल्हा तिस-या स्थानावर आहे.
फेब्रुवारी/मार्च २०१८ मध्ये बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यात मुले आणि मुली मिळून ३७ हजार ६६२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. ३७ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली असून पैकी ३३ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये २३ हजार ६८२ मुलांपैकी २० हजार ७८२ मुले उत्तीर्ण झाले आहेत. तर १३ हजार ८७४ मुलींपैकी १२ हजार ६७३ मुलींनी यश मिळविले आहे.
औरंगाबाद विभागात नेहमी दबदबा कायम राखणारा जिल्हा यंदा तिसºया क्रमांकावर राहिला आहे. गुणवत्तेचे प्रमाण का घसरले याबाबत सर्वच शाळा व्यवस्थापनाला विचार करुन यापुढे चांगल्या निकालासाठी नियोजन करावे लागणार आहे.
विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल : कला शाखेचा कमी निकाल
कला शाखेत १४ हजार ०४१ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी ५४१ परीक्षार्थींनी विशेष प्राविण्य, ६ हजार ९०६ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ३ हजार ७९८ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली. वाणिज्य शाखेत २ हजार ३५९ परीक्षार्थींनी परीक्षा देत २२३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, ९१७ परीक्षार्थींनी प्रथम श्रेणी, तर ९०७ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी मिळविली. एमसीव्हीमध्ये १४३३ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. त्यापैकी विशेष प्राविण्य ९१, प्रथम श्रेणी ८३५ व २३८ परीक्षार्थींनी द्वितीय श्रेणी पटकावली.
बीड तालुका अव्वल : धारुर तालुक्याचा निकाल कमी
बारावी परीक्षेत बीड तालुक्याने ९१.४१ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. तालुक्यात ८ हजार ९४५ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार १७७ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. धारूर तालुक्यात ५४२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी ५४१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २६६ मुले, तर १९१ मुली उत्तीर्ण झाल्या. टक्केवारीचे गुणप्रमाणे ८४.४७ एवढे आहे. एकूणच बारावी परीक्षेतील टक्केवारीत बीड सरस ठरला असून,धारूरचा निकाल सर्वांत कमी लागला. ९०.७९ टक्के घेऊन केज तालुका दुस-या स्थानी आहे.
पाटोद्यात मुले ठरली सरस; इतर सर्व ठिकाणी मुलीच अव्वल
विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील एकूण टक्केवारीचे प्रमाण ८७.७५ एवढे आहे, तर विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.३४ एवढे असून, जिल्ह्याचा सरासरी निकाल ८९.०८ एवढा लागला. गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. जिल्ह्यात केवळ पाटोदा तालुक्यात मुलींपेक्षा मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. पाटोदा वगळता इतर तालुक्यांमध्ये मुलीच अव्वल ठरल्या आहेत. यात ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण उल्लेखनीय असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे.