Beed: धाररूची वाण नदी उफाळली; पुलांवरून कार-रिक्षा वाहून गेले, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:25 IST2025-08-28T12:25:25+5:302025-08-28T12:25:47+5:30
या पाण्याच्या प्रवाहात चारचाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत.

Beed: धाररूची वाण नदी उफाळली; पुलांवरून कार-रिक्षा वाहून गेले, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता
किल्ले धारूर (बीड) : धारूर तालुक्यात बुधवारी (दि. २७) रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला असून धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील दोन पूल पाण्याखाली गेले आहेत. या पाण्याच्या प्रवाहात रात्री चारचाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. दरम्यान, यातील एकाच मृतदेह सापडला असून अद्याप एकजण बेपत्ता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. तांदळवाडी धरण भरून वाहत असून त्यामुळे आवरगाव व अंजनडोह येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्री रुईधारुरहून अंजनडोहकडे जाताना रात्री आठ वाजता आडत व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे (वय ४२) यांची कार पुलावरून वाहून गेली. प्रशासन, पोलीस व गावकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. अखेर गुरुवारी सकाळी सहा वाजता पुलापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला.
आवरगाव येथे तरुण बेपत्ता
दरम्यान, आवरगाव पुलावरूनही रात्री बारा वाजता एक रिक्षा वाहून गेल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातात अनिल बाबूराव लोखंडे ( २६ ) हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना इशारा दिला आहे की, नदी, नाला किंवा ओढा ओलांडताना पाण्याची पातळी धोकादायक नाही याची खात्री करूनच प्रयाण करावे.