Beed: ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:21 IST2025-12-18T18:21:33+5:302025-12-18T18:21:57+5:30
केजमधील घटना; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी कळंब बसस्थानकावरून जेरबंद

Beed: ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला बेड्या
केज : तालुक्यातील एका गावात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी आपल्या मोठ्या बहिणीसोबत आलेल्या एका १२ वर्षीय बालिकेवर एकाने अत्याचार केला. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी कळंब बसस्थानकावरून जेरबंद केले आहे.
पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेले आहेत, तर आईची मानसिक स्थिती ठीक नसल्याने ती नातेवाइकांकडे असते. अशा परिस्थितीत ६ वीच्या वर्गात शिकणारी ही पीडित बालिका आपल्या ऊसतोड मजूर बहिणीसोबत केज भागात आली होती. तिची मोठी बहीण आणि दाजी धारूर तालुक्यातील एका मुकादमाकडून उचल घेऊन केजमधील एका गावात ऊसतोडणीसाठी आले होते. सोमवारी रात्री सर्व मजूर शेतात उसाचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेले होते.
यावेळी आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे (वय ३४, रा. सोमनाथ बोरगाव, ता. अंबाजोगाई) हा देखील तिथेच होता. ही १२ वर्षांची बालिका नैसर्गिक विधीसाठी जात असताना, नराधम लक्ष्मणने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला सर्व प्रकार आपल्या बहिणीला सांगितल्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पोलिसांत धाव घेण्यात आली. गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. मात्र, युसूफवडगाव पोलिसांनी आरोपीला कळंब बसस्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पकडले. बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली.