Beed Crime: झेंडा लावण्यावरून वादातून दोन गटांत दगडफेक; आष्टी तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:34 IST2025-04-26T15:33:58+5:302025-04-26T15:34:38+5:30
Beed Crime: आष्टी तालुक्यातील खडकत गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात!

Beed Crime: झेंडा लावण्यावरून वादातून दोन गटांत दगडफेक; आष्टी तालुक्यातील घटना
कडा (जि. बीड) : १४ एप्रिल रोजी गावात काही ध्वज लावले होते. त्याचबरोबर, गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकात एका ध्वजाजवळ दुसरा ध्वज लावल्याच्या कारणावरून गावात तणावाचे वातावरण निर्माण होते. हे प्रकरण रोजच धुमसत असताना, शुक्रवारी पोलिसांचा फौजफाटा असतानाही दोन गटांत दगडफेक झाल्याची घटना घडली. आष्टी तालुक्यातील खडकत येथे हा प्रकार घडला.
आष्टी तालुक्यातील खडकत येथे छत्रपती संभाजी महाराज चौक आहे. याच ठिकाणी एका ध्वजाशेजारी दुसरा ध्वज लावल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकासह पोलिस प्रशासनाला दोन्ही गटातील तरुणांना समजून सांगत वाद होणार नाही, यासाठी मार्गदर्शन केले. गुरुवारी ध्वजही पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्त खाली काढण्यात आला, पण शुक्रवारी अचानक याच कारणावरून गावासह, बाहेर गावावरून आलेल्या तरुणांनी दगडफेक केल्याने यात काही जण जखमी झाले आहेत. सध्या गावात पोलिसांची कुमक वाढविण्यात आली असून, तणावपूर्ण शांतता असल्याचे बोलले जात आहे.
गावात पोलिस बंदोबस्त तैनात!
खडकत येथे जयंतीनिमित्त लावलेला एक झेंडा काढण्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पाटोदा ठाण्याचे पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, आष्टीचे प्रभारी ठाणे प्रमुख विजय नरवाडे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्यासह मुख्यालयातील आरएसपीच्या दोन ट्रॅकिंग फोर्स व स्थानिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.