Beed Crime: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; भीतीपोटी बापाने तिचे शिक्षणच केले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:55 IST2025-12-12T13:51:50+5:302025-12-12T13:55:02+5:30
बीडमधील प्रकार : बालकल्याण समितीसमोर पीडिता हजर नाही

Beed Crime: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; भीतीपोटी बापाने तिचे शिक्षणच केले बंद
बीड : नाशिकमधील मालेगाव, बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, आता बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणात आरोपीलाही लगेच अटक झाली, परंतु मुलगी असुरक्षित असल्याची भावना ठेवत पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या जबाबाला १४ दिवस उलटूनही तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले नव्हते. जर वेळीच हजर केले असते तर हा प्रकार समुपदेशनाने थांबवता आला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे.
५ नोव्हेंबर रोजी पीडितेची आई कामासाठी गेली असताना मुलगी खेळत होती. परत आल्यावर ती गायब दिसल्याने आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; परंतु नंतर मुलीने आपण मामाकडे गेल्याचे सांगितल्याने हा गुन्हा निकाली काढला जात होता. त्याच्या मंजुरीसाठी २२ नोव्हेंबर रोजी पत्रही पाठवले होते; परंतु अचानक यात नवा ट्विस्ट आला. २६ नोव्हेंबर रोजी मुलीने थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा जबाब घेण्यात आला. यात तिने ओळखीच्याच सूरजकुमार धोंडीराम खांडे (वय २२, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) याने जबरदस्ती केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्यात पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले. पोलिसांनी लगेच खांडेला बेड्या ठोकल्या. तो सध्या कारागृहात आहे.
कलम वाढ; पत्रासाठी आईचा दोन दिवसापासून खेटे
या प्रकरणात आधी अपहरण आणि नंतर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले. मात्र, मुलीच्या प्रकरणात कोणते कलम वाढले, याचे लेखी पत्र किंवा कागदपत्र मिळावे म्हणून तक्रारदार असलेली पीडितेची आई बुधवार व गुरुवार असे दोन दिवस पोलिस अधीक्षक कार्यालयात आली. बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्यासमवेत त्यांनी उपअधीक्षक पवार यांची भेटही घेतली; परंतु त्यांनी लेखी काहीच न देता केवळ तोंडी माहिती दिली, त्यामुळे आईने नाराजी व्यक्त करत घरी परतली. याआधीही शिरूर तालुक्यातील एका साडेसहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या आईला मदत न केल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केलेली आहे; पण त्याची अद्यापही चौकशी झालेली नाही. हे प्रकरण ताजे असतानाच, हा नवा प्रकार उघडकीस आल्याने बीड पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तपास योग्य पद्धतीने
गुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. तक्रारदाराला पूर्ण माहिती दिली जाईल. २४ तासांत बालकल्याण समितीसमोर हजर करावेच, असे बंधन नाही. आम्ही न्याय देण्याच्या भूमिकेत आहोत.
- पूजा पवार, उपअधीक्षक, बीड
पोलिसांना पत्र देऊ
अत्याचार असो की इतर कोणत्याही प्रकरणातील पीडितेला पोलिसांनी २४ तासांत आमच्यासमोर हजर करणे आवश्यक आहे. काळजी व संरक्षणाच्या अनुषंगाने हे गरजेचे आहे. यात पोलिसांना पत्र देणार आहोत.
-अशोक तांगडे, अध्यक्ष, बालकल्याण समिती, बीड
समुपदेशन गरजेचे होते
पीडितेच्या आईसह उपअधीक्षकांची भेट घेतली; परंतु त्यांनी कलम वाढीसह इतर पत्र देता येत नसल्याचे सांगितले. पीडितेला वेळीच समितीसमोर हजर केले असते, तर समुपदेशनाने हा प्रकार टळला असता.
-तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड