Beed Crime: धक्कादायक! मुलीचा बालविवाह लावला; नंतर जावयासोबतही अनैतिक संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:57 IST2025-09-19T11:57:06+5:302025-09-19T11:57:26+5:30
तक्रारदार मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या, कारण त्यांचे वडील २०१६ मध्ये घर सोडून गेले होते.

Beed Crime: धक्कादायक! मुलीचा बालविवाह लावला; नंतर जावयासोबतही अनैतिक संबंध
धारूर : तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या आई आणि नातेवाइकांनी तिची इच्छा नसताना तिचे लग्न लावून दिल्याची तक्रार धारूर पोलिस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे. लग्न झाल्यापासून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच पतीने अत्याचार तर केलाच पण आपल्याच आईचे पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पीडितेने तक्रारीत केला आहे.
तक्रारदार मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या, कारण त्यांचे वडील २०१६ मध्ये घर सोडून गेले होते. २०१७ मध्ये ती सातवीत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूरमधील एका मंदिरात लावून दिले. लग्नाला आपली इच्छा नसतानाही आई, सासू, मावशी, चुलत दीर, चुलत सासरा, आणि चुलत सासू यांनी लग्न लावले. त्यानंतर तिला सासरी नांदायला पाठवले गेले. तिथे तिच्या पतीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. याबाबत तिने आईला आणि सासूला सांगितले असता, त्यांनी तिलाच बळजबरी केली. या मुलीने आपल्या आईचे संबंध तिच्या पतीसोबत पाहिल्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. 'तु आम्हाला बदनाम करतेस' असे बोलून त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून ती मार्च २०२२ मध्ये आजी-आजोबांकडे गेली आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेथेही आई आणि पती पोहचले.
या त्रासातून सुटका व्हावी म्हणून ती १७ एप्रिल २०२२ रोजी मानवलोक सेवाभावी संस्था, अंबाजोगाई येथे गेली. तेथील अधिकारी अरुंधती पाटील यांना तिने सर्व हकीकत सांगितली. १८ एप्रिल २०२२ रोजी मानवलोक सेवाभावी संस्थेतील अश्विनी जगताप यांनी तिला बाल कल्याण समिती, बीड येथे हजर केले. समितीच्या आदेशानुसार ती अंबाजोगाई येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या बालगृहात राहत आहे. आता ऑगस्ट २०२५ मध्ये बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी भेट दिल्यावर हा छळ सांगितला. त्यानंतर याप्रकरणात चार वर्षांनंतर गुन्हा दाखल झाला आहे. बीडमधील बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य संतोष वारे, सुरेश राजहंस, छाया गडगे आदींनी पीडितेला धीर दिला.