आईला झोप लागली, इतक्यात दारुड्याने चिमूकलीला उचललं, अत्याचारानंतर झुडपात फेकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:58 IST2025-09-03T18:57:40+5:302025-09-03T18:58:43+5:30
परळी रेल्वेस्टेशनवर दारुड्याने चिमुरडीला नेले, सीसीटीव्हीत दिसले, अन् पोलिसांनी आरोपीला घरात झोपेत असतानाच उचलले!

आईला झोप लागली, इतक्यात दारुड्याने चिमूकलीला उचललं, अत्याचारानंतर झुडपात फेकलं
बीड : मजुरीच्या शोधात आलेले एक जोडपे आजारी असल्याने परळी रेल्वेस्थानकात झोपले. आईला झोप लागताच सहा वर्षांची चिमुकली इतरत्र खेळू लागली. तिला पाहून एका दारुड्या व्यक्तीने तिला कोल्ड्रिंकचे आमिष दाखविले. त्यामुळे ती हसत-खेळत त्याच्यासोबत स्थानकापासून दूर गेली. कोणी नसल्याची संधी साधून याच दारुड्याने या चिमुकलीवर भर दुपारी अत्याचार केला. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी लगेच स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यानंतर अवघ्या पाच तासांतच घरात झोपलेल्या या दारुड्याला बेड्या ठोकल्या. स्थानिक गुन्हे शाखा आणि संभाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
पीडित कुटुंब सोलापूर जिल्ह्यातील
पीडित कुटुंब हे सोलापूर जिल्ह्यातील आहे. मजुरी करून ते पोट भरतात. या जोडप्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. शनिवारी रात्री १० वाजता पंढरपूरमधून रेल्वेने ते रविवारी सकाळी साडेअकरा वाजता परळीत आले होते. तेथेच सर्दी-खोकल्याच्या गोळ्या खाऊन ते झोपले होते. पती थोडे बाजूला गेले होते, तर आईला झोप लागली होती. हीच संधी साधून नराधमाने चिमुकलीला आमिष दाखवून दूर नेत तिच्यावर अत्याचार केला.
आईसोबतही एकाची लगट करण्याचा प्रयत्न
पीडितेची आई भुकेली होती. तिला एका व्यक्तीने जेवणाचा डबा दिला. त्यानंतर हे सर्व तेथेच झोपले. यावेळी तेथे तिचा पती आला. महिलेने जेवण देणाऱ्या व्यक्तीची माणुसकी काही बरोबर वाटत नाही, असे बोलून दाखवले. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या फलाटावरून ते तिकीट काढण्याच्या ठिकाणी गेले होते. तेथेच आईला झोप लागली आणि मुलगी बाजूला खेळायला गेली होती.
सीसीटीव्हीची झाली मदत
घटनेनंतर संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनीही गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांचे पथक परळीला रवाना केले. तेथे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात एक व्यक्ती मुलीला हातात कशाची तरी बाटली दाखवत घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी याच फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढत घर गाठले आणि रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याला बेड्या ठोकल्या.
आरोपी परळीचा; पण राहतो सासरवाडीत
शेख सजन अलाबकस (वय २७, रा. झमझम कॉलनी, परळी, ह.मु. परभणी) असे नराधम आरोपीचे नाव आहे. तो दारू पिण्याच्या सवयीचा आहे. तो जरी मूळचा परळीचा असला तरी त्याची सासरवाडी परभणी जिल्ह्यात आहे आणि तो तिकडेच राहतो. पाच दिवसांपूर्वी तो परळीत आला होता. तो बांधकाम कामगार असल्याचे सांगण्यात आले.
चिमुकलीला झुडपात सोडून आरोपी फरार
रेल्वेस्थानकातून झुडपात नेत चिमुकलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिला तेथेच सोडून तो फरार झाला. इकडे आई आजार आणि प्रवासाने थकल्याने झोपलेलीच होती. मुलगी रडत आल्यावर आई उठली आणि तिने आरडाओरडा केला. त्यानंतर इतर प्रवासी जमा झाले. त्यांनी रेल्वे पोलिसांना संपर्क केला. रेल्वेने संभाजीनगर पोलिसांना संपर्क केल्यावर मुलीला परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात पाठविले. दरम्यान, आरोपीने यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का, हेदेखील तपासात उघड होणार आहे.
आरोपीला अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तपासात आणखी काही गोष्टी समोर येतील.
- ऋषिकेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबाजोगाई