वाल्मीक कराडची बी टीम अॅक्टिव्ह, पोलिसांनी चौकशी केली नाही; धनंजय देशमुखांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:18 IST2025-02-14T09:12:31+5:302025-02-14T09:18:22+5:30
Beed Crime News : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने अटक केली आहे.

वाल्मीक कराडची बी टीम अॅक्टिव्ह, पोलिसांनी चौकशी केली नाही; धनंजय देशमुखांचा आरोप
Beed Crime News ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने उलटून गेले आहेत. पण अजूनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. दरम्यान, आता धनंजय देशमुख यांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा आरोप देशमुख ( Santosh Deshmukh ) यांनी केला. पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही केला आहे. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये धनंजय देशमुख यांनी आरोप केले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपींना मदत करणाऱ्यांना अजूनही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. त्यांच्याबाबत पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
"ज्या ठिकाणी गुन्हे घडतात त्या ठिकाणी थांबवणे हे महत्वाचे आहे. माझ्या भावाची हत्या झाली. त्यामध्ये एक बी टीमही आहे, त्याची अजूनही चौकशी झालेली नाही. याचा आम्ही पुन्हा तपास करणार आहे. या बी टीमकडून भविष्यात कुणालाही त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करणार आहे, असंही धनंजय देशमुख म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पर्यंत मुख्य चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाडी गाडी आणि पैसे ा बी टीमने पुरवले आहेत असा आरोप करण्यात आला आहे. पण, त्यांच्यावर अजूनही कारवाई केली नसल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. याबाबत पोलिसांकडे सर्व पाठपुरावा केला असल्याचेही देशमुख म्हणाले.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासासाठी ५ सदस्यीय पथकाची नेमणूक
महादेव मुंडे हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची मागणी केली होती, याबाबत आता बीड पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. या प्रकरणाच्या तापासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये त्यांनी एसआयटी किंवा सीआयडीची मागणी केली होती.
महादेव मुंडे यांचा परळी तहसीला कार्यालयासमोर खून झाला होता. या हत्येला आता १५ महिने उलटले आहेत. पण, अजूनही आरोपी मोकाटच आहेत. या प्रकरणी आरोपींच्या अटकेच्या अनेकवेळा मागणी केली होती, पण पोलिसांनी कारवाई केली नव्हती. पण, आता जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. यामुळे आता या प्रकरणाच्या तापासाला गती येणार असल्याचे बोलले जात आहे.