Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:04 IST2025-05-27T18:02:05+5:302025-05-27T18:04:00+5:30
अपहरण करून शेतात नेले, झाडाला बांधून सात जणांनी केली अमानुष मारहाण

Beed Crime: अपहरण अन् मारहाण; पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मित्राला संपवलं
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : पत्नीसोबत अनैतिक संबंधांच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दगडू दत्तात्रय धपाटे ( २७ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दगडू यास त्याच्या मित्राने सोमवारी दुपारी शेतातील झाडाला बांधून इतर सहा जणांच्या मदतीने काठी, बेल्टने बेदम मारहाण करून पवनधाम मंदिराच्या परिसरात फेकून दिले होते. उपचारादरम्यान अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दगडू याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
केज तालुक्यातील भाटुंबा येथील दगडू उर्फ आण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा सोमवारी (दि. 26 ) सायंकाळी साडेचार वाजता मित्र सचिन करपे सह दुचाकीवरून जात होता. यावेळी सावळेश्वर (पैठण) येथील रोहन उर्फ रोहित मस्के, वैभव उर्फ सोन्या मस्के व लाडेगाव येथील सुहास पाटोळे, राजेश जंगले, अन्वर पठाण, रोहित धिरे, आशिष अंबाड यांनी त्यांची दुचाकी अडवली. दोघांनाही रोहन मस्केच्या मामाच्या शेतात नेऊन एका झाडाला बांधले. यानंतर सात ते आठ जणांनी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. त्यानंतर दगडू धपाटे आणि सचिन करपे या दोघांना गंभीर जखमी अवस्थेत औरंगपूर शिवारातील पावनधाम मंदिर परिसरातील रस्त्याच्या कडेला फेकून दिले. दरम्यान, एका मारेकऱ्याने दगडूच्या भावाला याची माहिती दिली. यावरून काही वेळातच सिद्धेश्वर धपाटे आणि गावकऱ्यांनी दगडू धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे या दोघांनाही अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना काही वेळातच दगडूचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर सचिन करपे याचेवर तेथेच उपचार सुरु आहेत.
मित्रानेच संपवले
सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे यांनी नातेवाईकांचे जवाब नोंदविले. दरम्यान, वैभव उर्फ सोन्या मस्के यास दगडूचे त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातूनच वैभव याने त्याचा भाऊ रोहन आणि इतर पाच जणांना सोबत घेत दगडू आणि सचिन यांचे अपहरण केले. शेतातील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याने दगडू याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सहा आरोपी अटकेत, एक फरार
या प्रकरणी मयताचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी सात जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रोहन उर्फ रोहित मस्के, वैभव उर्फ सोन्या मस्के रा सावळेश्वर (पैठण), सुहास पाटोळे, राजेश जंगले, अन्वर पठाण, रोहित धीरे, तिघेही रा लाडेगाव या सहा आरोपींना त्यांच्या घरातून व शेतातून जेरबंद केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिन्द्रनाथ शेंडगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान या प्रकरणातील आशिष अंबाड रा लाडेगाव हा अद्याप फरार आहे.