Beed: चहा पिण्याच्या बहाण्याने अपहरण करून दारू पाजली, मग सात तास डांबून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:40 IST2025-05-21T12:40:04+5:302025-05-21T12:40:56+5:30

संघटनेतील पद देण्यावरून वादातून घडला प्रकार

Beed Crime: Kidnapped and forced to drink alcohol on the pretext of drinking tea, then held and beaten for seven hours | Beed: चहा पिण्याच्या बहाण्याने अपहरण करून दारू पाजली, मग सात तास डांबून मारहाण

Beed: चहा पिण्याच्या बहाण्याने अपहरण करून दारू पाजली, मग सात तास डांबून मारहाण

बीड : ओळखीच्याच एकाने चहा पाजतो, असा बहाणा करून दुचाकीवरून दुर नेले. तेथे पाच ते सहा जणांनी दारू पाजली. नंतर वाहनातून अपहरण करून सात तास बेदम मारहाण केली. यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून अंगावर सर्वत्र व्रण उमटले आहेत. हा प्रकार १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडला. यातील जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

आप्पा काशिनाथ राठोड (वय ४५ रा.जीवणापुर ता.माजलगाव)असे जखमीचे नाव आहे. आप्पा हे गोरसेना संघटनेत सक्रीय आहेत. ते समनक संघटनेचेही पदाधिकारी आहेत. परंतू गावातीलच रमेश पवार नामक व्यक्तीने भाजपसोबत हात मिळवणी केल्याने त्याला पद देण्यास आप्पा यांनी विरोध केला. याचा राग मनात धरून ओळखीच्या दोन लोकांना पाठवून आप्पा हे पात्रूडवरून गावी जात असताना चहा पाजतो, असे सांगून दुचाकीवर बसवले. तेलगाव रोडवरील टालेवाडी फाटा येथे नेले. तेथे रमेश पवार व इतर पाच ते सहा लोक आधीच थांबले होते. तेथे आप्पाला दारू पाजली. त्यानंतर डोक्यात दांड्याने मारहाण केली. तेथून चारचाकी वाहनातून अपहरण करून पात्रूड, माजलगाव एमआयडीसी आदी भागात पहाटे तीन पर्यंत फिरवले. जवळपास सात तास त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये आप्पा यांचे डोके फुटले, शिवाय अंगावरही सर्वत्र व्रण आहेत. मारहाणीमुळे पाठ काळीनिळी झाली होती. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांपूर्वी गुंड पाठवले
दोन दिवसांपासून रमेश पवार हा आपल्यावर पाळत ठेवत होता. त्यानेच आपल्या घरी दोन दिवसांपासून गुंड पाठवले होते. तो प्लॅन यशस्वी न झाल्यानेच ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून बोलावून घेत अपहरण करून बेदम मारहाण केली. मला जीवे मारण्याचाच त्यांचा प्रयत्न होत, असा आरोपही आप्पा यांनी केला आहे.

व्हिडीओ बनवला
आप्पा राठोड यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील या गुंडांनी बनविला आहे. हाच व्हिडीओ व्हायरलची धमकी दिल्याचेही आप्पा यांनी सांगितले.

तक्रार देणार आहे
१८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अपहरण करून पहाटे ३ वाजता सोडले. या दरम्यान खुप मारहाण करून व्हिडीओ बनवले. दुसऱ्या दिवशी मी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांनी पत्र दिले. परंतू अद्याप जबाब घ्यायला कोणी आले नाहीत. सुट्टी होताच मीच तक्रार देणार आहे.
- आप्पा राठोड, जखमी

Web Title: Beed Crime: Kidnapped and forced to drink alcohol on the pretext of drinking tea, then held and beaten for seven hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.