Beed Crime: धक्कादायक! परळीत गुंगीचे औषध खाऊ घालून गायी चोरण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 19:35 IST2025-04-26T19:34:19+5:302025-04-26T19:35:05+5:30
Beed Crime: या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिस ठाणे गाठून दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Beed Crime: धक्कादायक! परळीत गुंगीचे औषध खाऊ घालून गायी चोरण्याचा प्रयत्न
परळी : शहरातील स्नेहनगर भागात शुकवारी मध्यरात्रीनंतर गाईंना गुंगीचे औषध खाऊ घालून डांबून नेण्याचा संतापजनक प्रयत्न घडला आहे. चार गाई अशक्त होऊन कोसळल्यानंतर काही लोकांनी एका गाडीत भरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्लॅन फसला आणि त्यांनी धूम ठोकली. याबाबत नागरिकांनी धाव घेताच परळी शहर पोलिसांनी चौकशी सुरू केली. शनिवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
स्नेहनगर भागात घटना घडली. त्या ठिकाणी गुंगीचे औषध लावलेली खारी बुंदी, बिस्किटे, शेंगदाणे व पाव आढळले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नात गुंगीच्या औषधाचा वापर झाल्याची प्राथमिक शंका व्यक्त केली. सध्या या गाईंवर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पोलिस ठाणे गाठून दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, गायींच्या चोरीच्या या प्रकारांमध्ये यापूर्वीही चर्चेत असलेली कार हीच वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस तपास सुरू आहे. आपआपली जनावरे रात्रीच्या दरम्यान बांधून निगराणीत ठेवावी तसेच मोकाट जनावरे यांच्याबाबत आजूबाजूच्या नागरिकांनी लक्ष ठेवावे, यापुढे मोकाट जनावराच्या संदर्भात नगर पालिकाच्यामार्फतीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संशयित वाहन अथवा जनावर चोरी बाबत हालचाल रात्रीच्या वेळी दिसून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन परळी शहरचे पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी केले.