Beed: पूरस्थितीत गावकऱ्यांची धाडसी कामगिरी; मृत्यूच्या दारातून बाहेर काढला गतीमंद तरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 14:42 IST2025-09-22T14:42:11+5:302025-09-22T14:42:42+5:30

तुफानी प्रवाहात गतीमंद तरुणाच्या जीवावर बेतलेला प्रसंग; गावकऱ्यांनी दाखवला पराक्रम

Beed: Brave performance of villagers in flood situation; abnormal youth pulled out from death's door | Beed: पूरस्थितीत गावकऱ्यांची धाडसी कामगिरी; मृत्यूच्या दारातून बाहेर काढला गतीमंद तरुण

Beed: पूरस्थितीत गावकऱ्यांची धाडसी कामगिरी; मृत्यूच्या दारातून बाहेर काढला गतीमंद तरुण

-नितीन कांबळे

कडा (बीड): आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असतानाच टाकळसिंग गावातील तरुणांनी दाखवलेल्या शौर्यकथेमुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी सकाळी पुराच्या पाण्यात एक गतीमंद तरुण वाहून जात असताना गावातील पाच जिगरबाज तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या पावसामुळे आष्टी तालुक्यातील कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा यांसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मोठमोठे पुल पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे. अशा गंभीर परिस्थितीत टाकळसिंग परिसरात नदीच्या पुराच्या पाण्यात एक भोळसर तरुण वाहून जाताना दिसला.

क्षणाचाही विलंब न करता गावातील केदार जगताप, सोमा जगताप, सुनील जगताप, काका जगताप आणि राजू जगताप यांनी जिवाची पर्वा न करता कमरेला दोर बांधून पुराच्या पाण्यात उडी घेतली. तुफानी प्रवाहाशी झुंज देत त्यांनी त्या तरुणाला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. सध्या त्या तरुणावर टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. मात्र, तो भोळसर असल्याने त्याची ओळख पटू शकलेली नाही. “या तरुणाला कोणी ओळखत असल्यास त्वरित आष्टी पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलिस हवालदार प्रवीण क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कडा, खिळद, सुलेमान देवळा, शिराळ, देवीनिमगाव, धानोरा, महेश मंदिर, केरूळ यासह अनेक गावांमधील मोठे पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. कडा-धामणगाव महामार्गावरील देवीनिमगाव पुलावरून, तसेच शिराळ परिसरातील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद करण्यात आले आहेत. इमनगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आष्टी-मिरजगाव मार्गावरही अडथळा निर्माण झाला आहे.

नदीकाठच्या परिसरातील शेतं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर-बीड मार्गावरील कडा नदीची पातळी सतत वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. “पूराच्या पाण्यावरून कोणत्याही परिस्थितीत वाहन नेऊ नये, सेल्फी किंवा स्टंटबाजी करू नये. प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील यांनी केले.

Web Title: Beed: Brave performance of villagers in flood situation; abnormal youth pulled out from death's door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.