Beed: पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर हास्य; अत्याचार पीडिता पुन्हा शाळेत
By सोमनाथ खताळ | Updated: December 25, 2025 18:54 IST2025-12-25T18:52:54+5:302025-12-25T18:54:09+5:30
विधी सेवा प्राधिकरणाचा आधार; आई-वडिलांच्या मनातील भीती दूर

Beed: पाठीवर दप्तर अन् चेहऱ्यावर हास्य; अत्याचार पीडिता पुन्हा शाळेत
बीड : नाशिकमधील मालेगाव आणि बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणाने मुलगी असुरक्षित असल्याची भावना मनात ठेवून पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले होते. हा प्रकार ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पालकांचे समुपदेशन केले. पालकांच्या मनातील भीती दूर होताच पीडितेचा मंगळवारी शाळेत पुन्हा प्रवेश निश्चित करण्यात आला. ती पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
५ नोव्हेंबर रोजी पीडिता बेपत्ता झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु नंतर पीडितेने यातील सत्य परिस्थिती सांगितल्यावर सूरजकुमार धोंडीराम खांडे (वय २२, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) याच्याविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटीची कलमे वाढवण्यात आली. पोलिसांनी तातडीने खांडेला बेड्या ठोकल्या होत्या. परंतु मुलीच्या काळजीपोटी आणि ती असुरक्षित असल्याची भावना मनात निर्माण झाल्याने पालकांनी तिचे शिक्षण बंद केले होते. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. वहाब सय्यद, तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी याबाबत पालकांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने पीडिता आता पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे.
खटला लढवण्यासाठी मोफत वकील
अत्याचार पीडित मुलीचे शिक्षण बंद झाल्याचे समजताच ‘लोकमत’ने या विषयावर प्रकाश टाकत १२ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची विधी सेवा प्राधिकरण, बालहक्क कार्यकर्ते आणि बालकल्याण समिती यांनी गंभीर दखल घेतली. पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत त्यांना आधार दिला. त्यांना कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांचे मन स्थिर झाले. आता प्राधिकरणाकडून पीडितेचा खटला लढवण्यासाठी एक मोफत वकीलही देण्यात आला आहे. तसेच ‘मनोधैर्य’सह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
समुपदेशन करून आधार
पालक घाबरलेले असल्याने त्यांनी मुलीचे शिक्षण बंद केले होते. आम्ही त्यांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. आता पुन्हा तिचा त्याच शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत पोहोचताच मुलगी खूप आनंदी झाली.
- तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड