बीडमध्ये चालकास कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलिसास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 18:04 IST2018-11-20T18:02:23+5:302018-11-20T18:04:11+5:30
वाहन तपासणीदरम्यान कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.

बीडमध्ये चालकास कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलिसास धक्काबुक्की
बीड : वाहन तपासणीदरम्यान कागदपत्रे मागितल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना बीड शहरातील गजबजलेल्या साठे चौकात मंगळवारी सकाळी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय निकाळजे असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. निकाळजेसह शेख अन्वर हे साठे चौकात कर्तव्य बजावत होते. याचवेळी निकाळजे यांनी गेवराईकडून येणारी दुचाकी अडविली. त्याला नाव विचारले असता त्याने अंकुश विठ्ठल जाधव (३० रा.पाचेगाव ता.गेवराई) असे नाव सांगितले. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यावने आपला नातेवाईक बळीराम राठोड (३२ रा.जायकवाडी ता.माजलगाव) याला संपर्क केला. राठोड आल्यानंतर त्याने तुम्हाला कसले कागदपत्रे दाखवायचे, असे म्हणत निकाळजे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अंकुशनेही त्यांना धक्काबुक्की केली.
हा सर्व प्रकार गजबजलेल्या चौकात झाल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली आणि वाद सोडविला. त्यानंतर अन्वर व निकाळजे यांनी दोघांनाही ताब्यात घेत बीड शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. निकाळजे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउपनि एस.बी.जाधव हे करीत आहेत.
महिला पोलिसासही झाली होती धक्काबुक्की
भाजी मंडईत कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासही दोन आठवड्यापूर्वी धक्काबुक्की झाली होती. याची नोंदही शहर ठाण्यात झाली होती. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.