वाळू वाहतूक करणारा टिप्पर विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोवर धडकला, सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:32 IST2025-08-01T13:31:40+5:302025-08-01T13:32:17+5:30
बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील सांगवी शिवारात झाला अपघात

वाळू वाहतूक करणारा टिप्पर विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोवर धडकला, सुदैवाने जीवितहानी टळली
- नितीन कांबळे
कडा ( बीड): टायर फुटल्याने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर विरुद्ध दिशेने जाऊन एका टेम्पोवर जाऊन धडकल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील सांगवी शिवारात घडली. सुदैवाने या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अहिल्यानगर येथून पीव्हीसी पाईप घेऊन एक टेम्पो ( क्रमांक एम.एच १६,ए.वाय.३२२३) सकाळी बीडकडे रवाना झाला. तर याचवेळी डोईठाण वरून धामणगावकडे अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर भरधाव वेगात जात होता. सकाळी साडेसहाच्या दरम्यान बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावरील आष्टी तालुक्यातील सांगवी परिसरात टायर फुटल्याने टेम्पो अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेला जाऊन टेम्पोवर धडकला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने चालक किरकोळ जखमी झाले आहेत. माहिती मिळताच घटनास्थळी कडा पोलिस चौकीचे पोलिस हवालदार भाऊसाहेब आहेर, अमोल नवले, वाहन चालक प्रताप घोडके यांनी भेट दिली असून पंचनामा केला आहे.
अपघातग्रस्त वाहने अद्याप रस्त्यावर
सकाळी साडेसहाच्या दरम्यान बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघात होऊन सहा तास उलटून देखील वाहने रस्त्यावरच उभा होती.