बीड शहरात कुंटणखान्यावर छापा, आंटीसह एजंट ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:17 IST2019-06-19T00:16:53+5:302019-06-19T00:17:21+5:30
शाहूनगर भागात एका खाजगी घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा मारला

बीड शहरात कुंटणखान्यावर छापा, आंटीसह एजंट ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील शाहूनगर भागात एका खाजगी घरात कुंटणखाना चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मंगळवारी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा मारला. यात पोलिसांनी आंटी राधिका वाघ व ज्ञानदेव रोकडे या दलालाला अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कमेसह इतर साहित्य जप्त केले आहे.
आंटी राधिका व दलाल ज्ञानदेव रोकडे यांनी शाहू नगर भागात दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते. त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील मुली येत असत, काही दिवस थांबून त्या वापस जात व पुन्हा मुली बदलून येत होत्या अशी माहिती आहे. तर आंटी राधिका ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मुलींचे फोटो, सर्व माहिती ग्राहकांना पाठवत, त्यानंतर ग्राहक येत. या गैरप्रकाराची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून मंगळवारी आरोपी राधिका वाघ व ज्ञानदेव रोकडे व एका पीडितेला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दलाल व आंटीविरोधात शिवाजीनगर ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या पो. उपनिरीक्षक राणी सानप, स.फौजदार शिवाजी भारती, प्रताप वाळके, सिंधू उगले, नीलम खटाने, मीना घोडके, शमीम पाशा, सतीश बहिरवाल, विकास नेवडे यांनी केली.
या प्रकरणातील पीडिता ही पश्चिम बंगालमधील असून तिला मुंबईच्या एका दलालाने बीडमध्ये विकले होते. अशी माहिती समोर येत आहे. तसेच पश्चिम बंगाल मधून आलेली मुलगी काही दिवस राहत असे व त्यानंतर ती परत जाऊन दुसरीला पाठवत अशी माहिती समोर आली आहे.