बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती नाही; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 04:49 PM2020-08-14T16:49:04+5:302020-08-14T16:54:27+5:30

ब्र.येळंब, नि.मायंबातून लाखो लिटर पाणी वाया

Bandharas are not repaired in time; Millions of liters of water wasted due to negligence of Irrigation Department | बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती नाही; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया

बंधाऱ्यांची वेळेत दुरुस्ती नाही; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाणी वाया

googlenewsNext
ठळक मुद्देशिरूर तालुक्यात सिंचन वाढणार तरी कसे? नदीकाठच्या शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही

- जालिंदर नन्नवरे

शिरूर कासार   :  पाटबंधारे विभाग आणि नेते मंडळीच्या दुर्लक्षामुळे तालुक्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण होत असते. कुचकामी धोरणामुळे तालुक्यातील बंधारे दुरुस्तीअभावी केवळ शोभेची वास्तू बनले आहेत. दरवाजे नसल्याने भर पावसाळ्यात या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे.

संपूर्ण तालुक्यांमध्ये दुष्काळ व पाणी टंचाई निवारणार्थ कोल्हापुरी व शिवकालीन बंधारे मोठ्या प्रमाणावर उभारले गेले आहेत. परंतु त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासन पातळीवर निधी उपलब्ध नसल्याने बंधाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. यामध्ये पाणीसाठा होण्याऐवजी लाखो लिटर पाणी डोळ्यादेखत वाया जाताना दिसत आहे. तालुक्यातील मुख्य नदी असलेल्या सिंदफणा नदीवर सद्यस्थितीत एकही बंधारा सुस्थितीत नसल्याने नदीमध्ये पाण्याचा एकही थेंबही साठवून राहत नाही. पयार्याने या प्रमुख नदीचा काडीचाही उपयोग नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना  होत नाही.

खोलीकरण रखडले
शिरूर शहराची तहान भागवणारा सिद्धेश्वर बंधारा गाळाने भरला आहे. सद्यस्थितीत बंधाऱ्यात पाणीसाठा कमी प्रमाणात होत असल्याने तो लवकरच कोरडा पडत आहे. यामुळे गाळ उपसा करून खोलीकरण करणे निकडीचे आहे. याकडेही पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे, असून हा कारभार पाटोद्यावरून चालतो.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुरुस्तीचा पाठपुरावा
मागील वर्षी नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडीच्या सरकारकडे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जलसंधारण मंत्र्यांकडे दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला आहे. परंतु विभागाला दुरुस्तीचे आदेश प्राप्त झाले नसल्याने अद्यापही बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडलेली आहे. अनेक वर्षापासून दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात असल्यामुळे उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडेठाक असते.

या बंधाऱ्यांना दुरुस्तीअभावी गळती
- सिंदफणा नदीवर ब्रह्मनाथ येळंब, निमगाव व साक्षाळपिंप्री येथील भव्य बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडल्याने दयनीय अवस्था झाली आहे.
- आर्वी येथील उथळा नदीवरील दोन बंधारे कित्येक वषार्पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
- यासह ग्रामीण भागात उभारलेले लहान लहान बंधारे देखील दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
- याचबरोबर सिंदफणा बंधाऱ्यावरील खोलीकरणही रखडलेले आहे.


गावाच्या पायथ्याला असलेला भव्य कोल्हापुरी बंधारा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे बंधाऱ्याचा मूळ हेतू मावळला असून, हा बंधारा केवळ सध्या शोभेची वास्तू बनला आहे.
- विनायक थोरात, सामाजिक कार्यकर्ते, ब्र. येळंब

संबंधित बंधारे पाटबंधारे विभागाने निर्माण केलेले असून त्याची दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधीची तरतूद विभागाकडे नाही. त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडलेली आहे. संबंधित विभागाने या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
- पठाण ए.के, जलसंधारण शाखा अभियंता, पाटोदा - शिरूर 

Web Title: Bandharas are not repaired in time; Millions of liters of water wasted due to negligence of Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.