खराब रस्त्याचा बळी! रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकल्याने दुचाकी उलटली, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 19:14 IST2023-12-12T19:13:49+5:302023-12-12T19:14:17+5:30
अपघाताची माहिती मिळताच मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी लागलीच गाडी थांबवत धाव घेतली.

खराब रस्त्याचा बळी! रस्त्यावर पडलेल्या भेगात चाक अडकल्याने दुचाकी उलटली, एकाचा मृत्यू
माजलगाव ( बीड) : माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर पडलेल्या भेंगामध्ये दुचाकीचे चाक अडकल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. अब्दुल हाफिज सत्तार खान ( ४९) असे मृताचे नाव असून ते पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी होते.
खामगाव ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत. या भेगांमध्ये चाक अडकून दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकीचे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आज पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेचे कर्मचारी अब्दुल हाफिज सत्तार खान ( ४९) हे कार्यालयाचे कामकाज संपल्यानंतर आपल्या घरी सिरसाळा येथे दुचाकीवरून जात होते. रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील रस्त्यावरील भेगात चाक अडल्याने दुचाकी ( एम.एच.३८ ए ७२१८ ) उलटली. डोक्याला जबर मार लागल्याने दुचाकीस्वार अब्दुल हाफिज सत्तार खान जागीच गतप्राण झाले.या घटनेनंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येऊन शवविच्छेदन करण्यात आले.
मनोज जरांगे यांनी घेतली धाव
दरम्यान, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे धारूर येथून माजलगाव तालुक्यातील सभेसाठी याच मार्गवरून जात होते. अपघाताची माहिती मिळताच जरांगे यांनी लागलीच गाडी थांबवत धाव घेतली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर जरांगे पुढे गेले.