जंतनाशक गोळी खाल्यानंतर चिमुकली बेशुद्ध पडली; उपचारादरम्यान झाला मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:19 IST2021-03-09T18:18:41+5:302021-03-09T18:19:38+5:30
Baby girl fell unconscious after taking the deworming pill शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच कारण स्पष्ट होईल अशी आरोग्य विभागाची माहिती

जंतनाशक गोळी खाल्यानंतर चिमुकली बेशुद्ध पडली; उपचारादरम्यान झाला मृत्यू
कडा : जंतनाशक गोळी खाल्यानंतर अचानक बेशुद्ध झालेल्या एका २२ महिन्यांच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील लोणी सय्यद मीर या गावात सोमवारी घडली. प्रांजल अंकुश रक्ताटे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे यांनी दिली.
प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,' लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशासेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले. परंतु, या गोळ्या कशा घ्यायचे हे सांगण्यात आले नाही. गोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली. गोळी खाल्यानंतर ती लागलीच जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.'
याबाबत आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे म्हणाले,'जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू आहे. गावात अशाप्रकारे कोणालाही त्रास झालेला नाही. गावात राहिलेल्या मुलांसाठी गोळ्यांचे वितरण केले. जंतनाशक गोळ्यांनी मृत्यू होत नाही शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच नेमके कारण स्पष्ट होईल.