संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:09 IST2025-09-11T12:06:28+5:302025-09-11T12:09:36+5:30
Santosh Deshmukh Case Update: या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयासमोर केला. आरोपींकडून 'डिले द ट्रायल अँड डिरेल द ट्रायल ऑपरेशन' चालविले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
बीड : मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींकडून वेळोवेळी वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळे अर्ज दाखल केले जात आहेत. या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जिल्हा न्यायालयासमोर बुधवारी केला तसेच आरोपीतर्फे डिले द ट्रायल अँड डिरेल द ट्रायल ऑपरेशन चालविले जात असल्याचा दावाही करण्यात आला.
बीड जिल्हा न्यायालयात बुधवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विशेष सरकारी वकील निकम म्हणाले, काही आरोपींनी त्यांची मकोका खटल्यातून दोषमुक्तीसाठी अर्ज दिला आहे.
सीआयडीने दाखल केलेले एकत्रित आरोपपत्र चुकीचे असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. हा अधिकार पोलिसांना नसून केवळ न्यायालयाला आहे, असे आरोपींचे म्हणणे होते. त्यावर आम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा कोल्हापूरच्या अंजनाबाई गावीत खटल्याचा निकाल आधार म्हणून न्यायालयाला दिला.
कराडची उच्च न्यायालयात धाव
आरोपींचे वकील विकास खाडे यांनी माध्यमांना सांगितले की, जिल्हा न्यायालयाने वाल्मीक कराड याचा दोषमुक्ती अर्ज नामंजूर केल्यानंतर उच्च न्यायालयात अपील केले आहे.
उच्च न्यायालयाने सरकारी पक्षाला यावर त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. या प्रकरणातील वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी स्वतंत्र आरोपपत्र दाखल होणे आवश्यक होते, मात्र सर्व आरोपपत्रे एकत्र केली गेली आहेत, हे चुकीचे आहे.